नाशिक : तीन युद्धांमध्ये सहभागी झालेले कासारेचे निवृत्त मेजर बी. एस. पाटील यांचे निधन | पुढारी

नाशिक : तीन युद्धांमध्ये सहभागी झालेले कासारेचे निवृत्त मेजर बी. एस. पाटील यांचे निधन

पिंपळनेर (नाशिक); पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील कासारे येथील भूमिपुत्र तथा सध्या औरंगाबाद येथे स्थायिक असलेल्या निवृत्त मेजर भटू सदा पाटील तथा बी. एस. पाटील (वय ९०) यांचे सकाळी पावणेनऊच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे, निवृत्त मेजर पाटील यांनी भारतातर्फे तीनही युद्धांमध्ये सहभाग नोंदविला होता.

कासारे येथून शिक्षण घेतल्यानंतर लष्करी सेवेत दाखल झालेले निवृत्त मेजर बी. एस. पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात हिमाचल, आसाम, राजस्थान, काश्मीरसह विविध सीमांवर कामगिरी बजावली आहे. भारतीय लष्करी सेवेत असताना त्यांनी १९६२ मध्ये चीनचे युद्ध, १९६५ व १९७२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध अशा तीन युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत बहुमूल्य कामगिरी बजावली होती. एक लढवय्ये सुपुत्र म्हणून त्यांनी कासारेचाच नव्हे, तर खानदेशाचा गौरव वाढविला होता.

शांततेच्या कालावधीतही त्यांची विविध लष्करी पदांवरील कारकीर्द उल्लेखनीय राहिली. औरंगाबाद येथील कारकिर्दीत त्यांनी भारतीय संचलित रेजिमेंटल शाळेच्या प्रगतीसाठी विशेष योगदान दिले. निवृत्तीनंतरही अनेक वर्षे ते शाळेच्या व्यवस्थापनाशी जोडले गेले होते.

एमजीएमसारख्या प्रसिद्ध आणि मोठ्या शिक्षण कारभारातही संस्थेच्या आप्पासाहेबांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. औरंगाबाद येथील एमजीएमच्या शिक्षण संकुलात विपश्यना केंद्राच्या उभारणीतही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या साक्री आगारातील वाहक सुभाष नारायण पाटील यांचे ते काका होते. निवृत्त शिक्षण संचालक भालचंद्र देसले, कासारे येथील आर. डि. देसले, आर. एन. देसले, विकास देसले, प्रा. युवराज काकुस्ते यांच्यासह कासारे येथील ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचलंत का?

Back to top button