मराठी साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये - पुढारी

मराठी साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख अखेर ठरली असून डिसेंबर महिन्यात 3, 4 आणि 5 या तारखांना नाशिककरांना साहित्य संमेलनाचा आस्वाद घेता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता साहित्य संमेलन उघड्यावर न घेता बंदिस्त व सोयीसुविधा असलेल्या जागेवर घेण्याचे निश्‍चित केले असून त्यानुसार भुजबळ नॉलेज सिटी येथे संमेलन भरणार आहे.

संमेलनाच्या तारखा आणि इतर माहिती देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म येथे पत्रकार परिषद झाली. छगन भुजबळ यांनी या साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्यासोबत यावेळी संमेलनाचे आयोजक जयप्रकाश जातेगावकर उपस्थित होते. याआधी संमेलन हे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणावर घेण्याचे नियोजन होते.

मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एमव्हीपी, संदीप फाऊंडेशन आणि भुजबळ नॉलेज सिटी असे काही पर्याय समोर आले, त्यापैकी सर्व सुविधायुक्‍त अशा भुजबळ नॉलेज सिटी येथेच संमेलन घेण्याचे निश्चित झाल्याचे जयप्रकाश जातेगावकर यांनी यावेळी सांगितले. बालसाहित्य संमेलनासाठी याच ठिकाणी बंदिस्त हॉल असून तीन दिवस पार पडणार्‍या संमेलनात स्वतंत्र सभागृहांमध्ये विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दि. 3 डिसेंबरला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून पंचवटीपर्यंत ग्रंथदिंडी निघेल. तेथून पुढे वाहनातून भुजबळ नॉलेज सिटीपर्यंत दिंडी नेली जाईल. रात्री कविसंमेलन असेल.

4 डिसेंबरला रामदास भटकळ यांची मुलाखत, रात्री नाशिकमधील शंभर ते दीडशे कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. 5 डिसेंबरला विविध विषयांवरील परिसंवाद आणि रात्री आंतरराष्ट्रीय दर्जावरील कलाकारांची सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि शफाअत खान यांना निमंत्रित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

उद्घाटन साहित्यिकांच्याच हस्ते

मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आणि समारोप या दोन्ही कार्यक्रमांना साहित्यिकांनाच बोलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ठाले-पाटील यांची कोणतीही नाराजी नाही. केवळ तारखांवरून मतभेद होते. त्यासंदर्भात पत्रव्यवहारही झाला असून, नाशिककरांनी साहित्य संमेलन यशस्वी पार पाडावे, असे आवाहन यावेळी केले.

Back to top button