नंदुरबार ZP: शिवसेनेच्या राम रघुवंशी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड | पुढारी

नंदुरबार ZP: शिवसेनेच्या राम रघुवंशी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

येथील जिल्हा परिषदेच्या ( नंदुरबार ZP ) ११ गटात आणि पंचायत समितीच्या १४ गणात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर पक्षीय बलाबल बदलले. तथापि काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता जैसे थे राहिली आहे. उपाध्यक्षपदासाठी एकमेव शिवसेनेचे ॲड. राम रघुवंशी यांचा अर्ज दाखल झाला. तर सभापतिपदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके आणि काँग्रेसचे अजित नाईक यांचा अर्ज दाखल झाला आहे. विरोधात कोणाचाही अर्ज नसल्याने हे सर्व बिनविरोध निवडून आले. निवडीची औपचारिक घोषणा दुपारी तीन वाजता करण्यात आली.

बिनविरोध निवड झालेले सभापती अजित नाईक यांचे अभिनंदन करताना पालक मंत्री ॲड. के. सी. पाडवी, आमदार शिरीष नाईक व अन्य.
बिनविरोध निवड झालेले सभापती अजित नाईक यांचे अभिनंदन करताना पालक मंत्री ॲड. के. सी. पाडवी, आमदार शिरीष नाईक व अन्य.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र ॲड. राम रघुवंशी यांना उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. परंतु त्यांनी दणदणीत विजय प्राप्त केला शिवाय नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटात आणि पंचायत समितीच्या १४ गणात झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना यश मिळाले. जिल्हा परिषदेतील ( नंदुरबार ZP ) सत्ता काँग्रेस आणि शिवसेनेच्याच ताब्यात राहणार हे त्यावरून स्पष्ट झाले होते. तथापि नेते मंडळी नंदुरबार जिल्हा परिषदेतील प्रमुख पदांविषयीचे सूत्र जुने आहे तसेच ठेवतात की, नवा भिडू नवा डाव असे म्हणत बदल करतात; याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.

( नंदुरबार ZP ) उपाध्यक्ष पद शिवसेनेकडेच राहील व शिवसेना आपला हिस्सा आहे तसाच कायम ठेवण्याच्या भूमिकेत राहील, याचे संकेत रघुवंशी यांनी आधीच दिले होते. आजच्या निवडी प्रसंगी प्रत्यक्षात तसे घडले. उपाध्यक्ष पद आणि एक सभापती पद शिवसेनेला मिळाले. त्यानुसार आज उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज राम रघुवंशी यांनी तर सभापतिपदासाठी एकमेव गणेश पराडके यांनी अर्ज दाखल केला.

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी यांचा राजकारणात प्रथमच प्रवेश झाला आहे. त्या खापर गटातून विजयी झाल्या आहेत. जिल्हा परिषदेत त्या केवळ सदस्य म्हणून बसतील की, मानाच्या पदावर बसतील? त्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. तथापि मागील निवडणुकीत दुखावले गेलेले अजित नाईक यांना सत्तेत सामावून घेत काँग्रेस पक्षाने सभापतिपद दिले. त्यामुळे आज सभापतीपदासाठी त्यांचाही अर्ज दाखल झालेला पाहायला मिळाला.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांची पहिलीच राजकीय टर्म आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या त्या कन्या आहेत. त्यांची मुदत बाकी असल्यामुळे जिल्हा परिषदेतील नव्या सत्ता गणिताचा त्यांच्या पदावर परिणाम झालेला नाही. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी निवडणूक झाली तेव्हा भाजपा २३, काँग्रेस २३, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी ३ असे संख्याबळ होते. शिवसेना आणि काँग्रेस मिळून ३० चे संख्याबाळ पूर्ण होत असल्याने त्याप्रसंगी दोघे मिळून सत्ता स्थापन केली होती.

राष्ट्रवादीचे तीन सदस्य मात्र भाजपा सोबत राहिले होते. आता काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे संख्याबळ पूर्वीपेक्षा एकेक जागेने वाढले आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेस २४ शिवसेना ८ आणि राष्ट्रवादी ३ असे संख्याबळ बनले आहे.

Back to top button