नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये दररोज हजारो ट्रक कांदा येतो. अशात दोन-चार ट्रक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी त्यांनी ५०० ट्रक कांदा घेऊन जावा, अशा शब्दात पालकमंत्री दादा भुसे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याचे सांगत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करीत, राज्यातील सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचे वांधे केले आहेत.
विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री भुसे म्हणाले की, कांद्याला आणखी भाव मिळत आहे. नाफेडसाठी एक लाख क्विंटल कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे. यावेळी मुख्यमंत्री राव यांच्या कांदा खरेदीवर, राजकीय हितासाठी त्यांनी कांदा खरेदी करू नये, अशा शब्दात टीका केली. तसेच भारतात लोकशाही असून, जनतेच्या दरबारात कोणीही जाऊ शकते. त्यामुळे राव यांनी खात्री करून आगामी निवडणुकांमध्ये उतरावे, असेही भुसे म्हणाले. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदावरून केलेल्या भाष्यावरही भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री कोण होणार हे एकनाथ शिंदे यांना माहिती नव्हते, हे मी स्वत: पाहिले आहे. त्यामुळे देशमुख यांच्या विधानाबाबत मला माहिती नाही. निधीवाटपावरून भुसे म्हणाले, 'डीपीडीसीत दोनपट निधी दिला जातो. त्यामुळे अतिरिक्त निधी देण्याबाबतचा जावई शोध कोणी लावला मला माहिती नाही. निधीवाटपात कोणताही दुजाभाव केला नसून, भुजबळांसह आमदार सुहास कांदेंना समान निधी दिल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. धुळ्याप्रमाणे मालेगाव जिल्हा व्हावा, असा उल्लेख त्यांनी पुन्हा एकदा केला. ३० वर्षांपासून मालेगाव जिल्हा व्हावा, अशी आमची मागणी असून, राजकीय इच्छाशक्तीच्या माध्यमातून हा निर्णय होऊ शकतो, असेही ते म्हणाले. इगतपुरी येथील अवैध धंद्यांबाबतची वस्तुस्थिती पुढे येणार असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याबाबत कारवाई करतील, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
मनपा आयुक्तांचा निर्णय मुख्यमंत्री घेतील
नाशिक महापालिकेचे आयुक्तपद रिक्त असून, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी यांच्या वडिलांच्या तब्येतीचा विषय असल्याने ते सध्या सुटीवर आहेत. तसेच शासकीय नोकऱ्यांमधील बदल्या हा नियमित भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.