नाशिक : ‘चिंगचॉग’ ला तब्बल १४ वर्षांनंतर मिळाले आईवडील | पुढारी

नाशिक : 'चिंगचॉग' ला तब्बल १४ वर्षांनंतर मिळाले आईवडील

दिंडोरी (नाशिक); समाधान पाटील : अंमली पदार्थांच्या आहारी जावून स्मरणशक्ती हरवून दिंडोरी शहरात दोन वर्ष वास्तव्यास असणार्‍या चिंगचॉग याला पुन्हा आपले हक्काचे घर मिळाले आहे. तब्बल १४ वर्षानंतर चिंगचॉग हा सिक्कीम जावून आपल्या आई-वडिलांसह नातेवाईकांना भेटणार आहे. चिंगचॉगचा आता सिक्किम परतीचा प्रवास सुरु झाला आहे. एखाद्या चित्रपटाला साजेशी अशीच कथा दिंडोरी शहरात घडली आहे.

दिंडोरी शहरात दोन वर्षापुर्वी बसस्थानकात एका वेडसर माणसाला काही तरुण दगडे मारून छेड काढत होती. याआधी नाशिकच्या फुलेनगर येथून काही तरुणानी त्याच्या खिशातुन पैसे काढून घेतले होते. त्यामुळे खिशात पैसे नसल्याने तो पायान चालत- चालत दिंडोरीत आला होता.

बसस्थानकात रात्री देखील काही तरुण या युवकासोबत हुल्लडबाजी करीत असल्याने बसस्थानकात बाहेर आवाज येत होता. त्यामुळे रस्त्याने जाणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे विलासनाना देशमुख यांनी बसस्थानकात जावून पाहिले. तेव्हा त्यांना एका वेडसर तरूणाची काही टवाळखोर पोरं छेड काढल्याची बाब लक्षात आले.

यानंतर टवाळखोर पोराना विलासनाना यांनी तेथून हटकले आणि त्या वेडसर युवकास मोटारसायकलच्या मागे बसवून घरी आणले. विलासनाना यांनी त्या युवकाकडे बघून परप्रातीय असल्याचा अंदाज लावला, याशिवाय त्याची स्मरणशक्तीही कमी झाल्याने त्याला बोलताही येत नव्हते. यावेळी त्याला आपले नाव आणि गाव सुद्धा सांगता येत नव्हते.

ड्रग्जच्या आहारी गेल्याने त्याला काही कळतही नव्हते. विलासनाना देशमुख व त्यांच्या पत्नी पुष्पा देशमुख यांनी या युवकांची दया आल्याने त्याला आसरा दिला. यानंतर तो चिनी, नेपाळीसारखा दिसत असल्याने घरगडयांनी त्याचे नाव चिंगचाँग ठेवले. हा चिंगचाँग मग घरातील कामे आणि शेतीचे कामे करु लागला.

यानंतर तो हळुहळु मराठी आणि हिंदी बोलू लागला. मग एक दिवस अचानक सहज बसले असताना विलासनाना यांनी एका बिहारी माणसाला बोलावले. घरातील कामे करीत असताना या चिंगचॉगला त्याच्या गावाचे आणि त्याचे स्वत:चे नाव विचारले. चिंगचॉगने गावाचे नाव सिक्क्किमधील तुरुक असल्याचे सांगितले.यासोबत स्वत:चे नाव किशोर रॉय हे देखील सांगितले. यानंतर बिहारी मजुराने त्याचा ऑनलाईन पत्त्ता शोधला.

विलास नाना देशमुख यांनी वेळ न दवडता लगेच दिंडोरी पोस्ट कार्यालयात जाऊन चिंगचॉँगच्या घरी पत्र रजिस्टर केले. एक महिन्याने त्याच्या घरुन उत्तर मिळाले. चिंगचॉग हा तुरुकला एक चांगला कॉन्ट्रक्टर होता. परंतु, ड्रग्जच्या आहारी गेल्याने त्याची स्मरणशक्ती कमी झाली होती. त्यामुळे तो फिरत- फिरत भटकत होता. याशिवाय त्याचे लग्न झाले असून त्याला लहान मुलगीही होती.

चिंगचॉँग घर सोडून गेल्यानंतर घरातील व्यक्तिंनी चार वर्ष त्याचा शोध घेतला. अखेरीस किशोरचा दशक्रिया विधी, क्रिया कर्म करण्यात आले. त्याच्या घरात त्याच्या फोटोला हार घालण्यात आलेला आहे. त्यानंतर त्याची पत्नी आणि लहान मुलगी नेपाळला निघून गेले.

तब्बल १४ वर्षांनंतर विलास देशमुख यांनी त्याच्या घरच्यांशी मोबाईलवर संपर्क साधला. व्हिडीओ कॉल करण्यात आला. त्याच्या आई- वडीलांनी त्याला ओळखले. त्यानेही त्याच्या बहिणीला ओळखले. यानंतर बहिणीचा नवरा आणि तेथील पत्रकार दोघेही विमानाने मुबंई आले. या पाहूण्याचे आदरातिथ्य करून किशोरला त्याच्या नातेवाईकाच्या हवाली केलं.

याच वेळी बहिणीचा नवऱ्याने किशेरला त्याच्या मुलीचा फोटो दाखवला ती सध्या १८ वर्षाची झाली आहे. सध्या किशोर दिंडोरीतून निघाला असुन तो चार दिवसांनी सिक्किमला आपल्या घरी पोहोचणार आहे.

एक मुलगा तब्बल १४ वर्षानंतर आपल्या आई- वडीलांच्या भेटणार असल्याने त्याच्या आनंद गगनात मावेना झाला आहे. चिंगचॉगला दोन वर्ष मुलाप्रमाणे सांभाळणार्‍या विलासनाना देशमुख व त्यांच्या पत्नी सौ. पुष्पा देशमुख यांचे डोळे मात्र, त्याला निरोप देताना पाणावले होते.

अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यानंतर सिक्किममधून हरवलेल्या किशोर रॉयला विलास देशमुख यांच्या प्रयत्नामुळे तब्बल १४ वर्षानंतर घर सापडले आहे. यामुळे घरी जाताना किशोरच्या चेहर्‍यावर पसरलेला आनंद त्याने उड्ड्या मारुन व्यक्त केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button