जळगाव येथे एकाकडून पिस्तूलासह काडतूस जप्त - पुढारी

जळगाव येथे एकाकडून पिस्तूलासह काडतूस जप्त

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: शहरातील मेहरूण परिसरातील कृष्णा लॉन येथे गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या एका तरूणाला एमआयडीसी पोलीसानी अटक केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, शहरातील मेहरूण परिसरातील कृष्णा लॉन परिसरात एक तरूण बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्तूल आणि काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील पोलीसांनी शुक्रवारी (दि. २२) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी योगेश अंबादास बारी (वय-३१, रा. बारीवाडा पिंप्राळा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहेत.

याप्रकरणी रात्री उशीराने पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश बारी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : कोल्हापुरातील गूढ गयाक्षेत्र

Back to top button