DDCC Bank: धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चार जागा बिनविरोध | पुढारी

DDCC Bank: धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चार जागा बिनविरोध

धुळे; पुढारी वृत्तसेवा : DDCC Bank : धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात सर्वसमावेशक शेतकरी पॅनलच्या तीन तर शिवसेनेच्या एका जागेचा समावेश आहे. आज उमेदवारी छाननीत शिरपूर मतदार संघातील एक अर्ज बाद झाल्याने माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण हे बिनविरोध झाले आहेत. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बैठका घेऊन प्रयत्न सुरु केले आहेत.

धुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यात शिरपूर तालुका सोसायटी गटातुन राजधर पाटील यांच्या अर्जावरील अनुमोदकाची स्वाक्षरी बनावट असल्याची हरकत माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी घेतली. या हरकतीवर सुनावणी झाल्यानंतर पाटील यांचा अर्ज  बाद झाल्याने शेतकरी सर्वसमावेशक पॅनलचे माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण हे बिनविरोध झाले आहेत.

तर  विवीध कार्यकारी संस्था मतदार संघातुन नंदुरबार जिल्हयातील शहादा मतदार संघातून दिपक पाटील, तळोदा येथून भरत माळी तर अक्कलकुवा मतदार संघातून शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या विरोधात एकही उमेदवार नसल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता 13 जागांसाठी 66 उमेदवार रिंगणात असून 8 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.

दरम्यान ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना वगळुन सर्व पक्षांचे नेते संघटीत झाले असुन त्यांनी शेतकरी सर्वसमावेशक पॅनल करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पॅनलचे समर्थक असणारे दिपक पाटील, भरत माळी व प्रभाकर चव्हाण हे बिनविरोध झाल्याने या पॅनलची विजयी वाटचाल सुरु झाली आहे. भाजपाचे आमदार अमरीशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील, राज्याचे मंत्री के. सी. पाडवी, राष्ट्रवादीचे किरण पाटील, माजी आमदार शरद पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. दरम्यान बिनविरोध झालेले दिपक पाटील, भरत माळी व प्रभाकर चव्हाण यांनी मावळते चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांची भेट घेतली आहे.

Back to top button