धुळे मनपात सत्ताधारी भाजप नगरसेवकाकडूनच भ्रष्टाचाराचा आरोप ! | पुढारी

धुळे मनपात सत्ताधारी भाजप नगरसेवकाकडूनच भ्रष्टाचाराचा आरोप !

धुळे; पुढारी वृत्तसेवा

धुळे महानगरपालिकेकडून डास निर्मुलनसाठी दिलेल्या ठेक्यात एक कोटी 42 लाख 58 हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक शीतल नवले यांनी केला आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

धुळे महानगरपालिका मधील सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. धुळे महानगरपालिका माध्यमातून शहरात एकात्मिक डास नियंत्रणासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. पण या निविदा प्रक्रियेमध्ये दिग्विजय इंटरप्राइजेसला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.

या कामासाठी इतर दोन निविदा देखील आल्या होत्या. मात्र या निविदा उघडून देखील पाहण्यात आल्या नाहीत. स्थायी समितीने दिग्विजय इंटरप्राइजेसला वार्षिक चार कोटी 76 लाख 21 हजार 900 रुपये या दराने काम दिले. तीन वर्षांसाठी 14 कोटी 25 लाख 89 हजार रुपयांचा हा ठेका आहे. स्थायी समिती व सभापतींनी केलेल्या ठरावाच्या अधीन न राहता चुकीच्या पद्धतीने महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी करार केला असल्याचा आरोप नवले यांनी केला.

महापालिका व दिग्विजय इंटरप्राइजेस मध्ये करार करताना एक कोटी 42 लाख 58 हजार 970 रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या ठरावामध्ये वार्षिक दरवाढीचा उल्लेख नाही. मात्र महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या करारात ठेकेदाराला प्रत्येक वर्षी दहा टक्के दरवाढ देण्यात येईल असे नमूद आहे. याचा अर्थ कंपनीला दुसऱ्या वर्षी 47 लाख 52 हजार 990 रुपये तर तिसऱ्या वर्षी 95 लाख 5 हजार 980 रुपये असे एकूण 1 कोटी 42 लाख 58 हजार 980 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत.

आरोग्य विभागातील जे कर्मचारी या भ्रष्टाचारात सहभागी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. कार्यालयीन टिप्पणी व स्थायी समितीच्या ठरावात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फेरफार केली असून त्यांच्याविरोधात तातडीने गुन्हे दाखल केले पाहिजे. गुन्हे दाखल न केल्यास या प्रकरणात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

दरम्यान महापालिका आणि दिग्विजय इंटरप्राइजेस यांच्यात झालेल्या करारावर तत्कालीन आयुक्त अजिज शेख यांची स्वाक्षरी असून त्यांच्यावर देखील कारवाईसाठी पत्रव्यवहार करावा, असेही नवले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. सत्ताधारी गटाचे नगरसेवक असलेल्या नवले यांनीच महानगर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Back to top button