नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 28) सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप- मनसेनेने काही जागांवर या दोन्ही नेत्यांना आव्हान दिले असले तरी ही आघाडी दोन्ही नेत्यांपैकी कोणाचे गणित बिघडवते हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
बाजार समितीच्या सोसायटी गटातील 11 व ग्रामपंचायत गटातील चार, व्यापारी गटातील दोन व हमाल मापारी गटातील एका जागेसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोसायटी गटातील 1271, ग्रामपंचायत गटात 1063, व्यापारी गटात 171 तर हमाल व्यापारी गटात 352 असे एकूण 2857 मतदार संचालकांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. सर्व मतदारांना एका ठिकाणी मतदानाला यावे लागू नये यासाठी तालुक्याच्या विविध भागात सात गावांत मतदान केंद्रे असणार आहेत. त्यात सिन्नर, वावी, शहा, डुबेरे, पांडुर्ली, वडांगळी, नांदूरशिंगोटे या गावांचा समावेश आहे. बाजार समितीवर गेल्या 20-25 वर्षांपासून आमदार कोकाटे यांचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत वाजे गटाने कोकाटे गटाशी तुल्यबळ लढत दिली होती. यापूर्वीच्या तालुक्यातील निवडणुका नेहमी तत्कालीन दोन नेत्यांच्या गटांमध्ये होत असत. यंदा पहिल्यांदाच भाजप-मनसेने पूर्ण पॅनल उभे करता आले नसले, तरी तिसरे पॅनल उभे केले असून पहिल्यांदाच प्रचाराला फिरत आहे.