Dhule Crime : सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडून मद्याची तस्करी; 'असा' केला पर्दाफाश | पुढारी

Dhule Crime : सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडून मद्याची तस्करी; 'असा' केला पर्दाफाश

धुळे : पुढारी वृत्तसेवा

सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडोशाला मद्याची चोरटी वाहतूक करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी हाणून पाडला. गोवा येथून सुरतकडे मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना गजाआड करण्यात आले आहे. मदय तस्करी रोखणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जाहीर केले आहे.

मुंबई आग्रा महामार्गावरून मद्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील या कर्मचाऱ्यांना आर्वी ते धुळे मार्गावर गस्त घालण्याचे आदेश दिले. त्यानुसार यु पी 80 एफ टी 93 98 क्रमांकाचा ट्रक या पथकाने अडवला. या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये सॅनिटरी पॅडची वाहतूक होत असल्याचे चालक आणि क्लीनर ने सांगितले. यासाठी त्यांनी या मालाची बनावट कागदपत्रे देखील दाखवली. मात्र या गाडीमध्ये मद्याची तस्करी होत असल्याची पक्की माहिती असल्यामुळे या गाडीचे चालक अर्जुन रामजीत बिंद आणि क्लीनर सोमनाथ नाना कोळी या दोघांना ताब्यात घेतले. गाडीमधून सॅनिटरी पॅडच्या गोण्या बाजूला केल्या असता मद्याचे खोके आढळून आले. पोलीस पथकाने देशी-विदेशी मद्याचे 205 खोके जप्त केले असून बियरचे 20 बॉक्स देखील जप्त करण्यात आले आहे. या गाडीमधून आठ लाख 22 हजार 600 रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

म्होरक्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली

दरम्यान या संदर्भातील माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील हे उपस्थित होते. ही मद्याची तस्करी गोवा येथून सुरत कडे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गोवा येथील नामांकित कंपनीमध्ये तयार केलेले हे मद्य असून शासनाच्या आदेशाचा भंग करून या मद्याची तस्करी होत होती. आता मद्य तस्करीच्या म्होरक्याला ताब्यात घेण्यासाठीची कार्यवाही सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर ही कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक त्यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button