नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'शिवसेना तुम्ही फोडली, तुम्ही भांडणे लावलीत, अशी कामे शरद पवार करत नाहीत', अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले.
'त्या' एका माणसामुळे दोन भावांमध्ये भांडणे सुरू असून, शिवसेनेच्या फुटीसाठी सुद्धा तेच कारणीभूत असल्याचा आरोप ना. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला होता. यास भुजबळांनी माध्यमांशी बोलताना चोख प्रत्युत्तर दिले. शरद पवार दोनदिवसीय नाशिक दौर्यावर असून, याविषयी भुजबळांना विचारले असता, 'शिवसेना फुटली, या फुटीमागे कुणाचा हात आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. दोन भावांमध्ये आम्ही नाही तर तुम्ही भांडण लावलीत. अन् हे भांडण कुणी लावले, हेदेखील सर्वांना माहीत आहे. असे काम पवार करत नाहीत.' तसेच भुजबळ म्हणाले, 'शरद पवार दोन दिवस नाशिकमध्ये असून, इंडियन प्रेस मजदूर संघांच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. या दौर्यात कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार नाही. तसेच देवळाली मतदारसंघात काही कार्यक्रम आहेत. निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या दौर्यात निवडणुकांची काही चर्चा होणार नाही.' असेही ते म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी शनिवारी (दि.8) पत्रकार परिषद घेत देशात सुरू असलेल्या हिंडेनबर्ग या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. यावर भुजबळ म्हणाले, 'आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करू नये, आपली बदनामी होता कामा नये. टाटा, बिर्ला यांनीदेखील खूप चांगले काम केले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, उद्योगपतींच्या बाबतीत कुठपर्यंत ताणून धरायचे? देशासह राज्यात इतरही अनेक मुद्दे असून, यावर चर्चा झाली नाही. मात्र काही लोकांना टार्गेट करण्यात आले. त्यांचे मत कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही.'
नेत्यांचा अपेक्षाभंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्तिभावाने अयोध्येला जावे. राजकारण करू नये. जनसेवा हीच ईश्वर सेवा असून, शिंदेंवर फार मोठी जबाबदारी आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार अजून होत नसल्याने अनेक नेत्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे भुजबळ म्हणाले. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, अशा परिस्थितीत केसरकरांच्या वक्तव्याला महत्त्व नाही. फडतूस, काडतूस असे वक्तव्य होत आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेना (ठाकरे गट) युती होईल असे वाटत नाही.
अजित पवार आजारी
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 'नॉट रिचेबल' असल्याच्या चर्चांवर भुजबळ म्हणाले की, आजारी असल्याने अजित पवार यांनी दौरा रद्द केला. त्यामुळे नॉट रिचेबलच्या चर्चांना महत्त्व नाही. तसेच ईव्हीएम मशीनबाबत ते म्हणाले की, अनेक देशांनी ईव्हीएम मशीन बंद केले आहेत. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. अशात निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन वापरले जाऊ नये, असेही भुजबळ म्हणाले.