नाशिक : भूमिअभिलेख उपसंचालकानंतर लिपीक लाच घेताना जाळ्यात | पुढारी

नाशिक : भूमिअभिलेख उपसंचालकानंतर लिपीक लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भूमिअभिलेख कार्यालयातील प्रभारी उपसंचालक तथा अधीक्षकास एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर तेथील गैरव्यवहारांची चर्चा रंगली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई होऊनही कार्यालयातील लाचखोर लोकसेवकांची हाव सुटत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून भूमिअभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी लिपीक नीलेश शंकर कापसे (३७, रा. उदयनगर, मखमलाबाद रोड) यास ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

गट क्रमांकाच्या खुणा दर्शवण्यासह कच्चा नकाशा देण्यासाठी लाचेची मागणी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पळसे येथील ३० वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, प्रतिलिपी लिपीक संशयित नीलेश कापसे याने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकाची मोजणी करून कच्चा नकाशा देण्यासह पोटहिश्श्याच्या खुणा दर्शवून नकाशा देण्यासाठी आणि त्यानंतर स्वाक्षरी व शिक्क्यांसाठी अडीच लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली. मात्र, तक्रारदाराने तात्पुरते केवळ पोटहिश्श्याच्या खुणा दर्शवून कच्चा नकाशा देण्याची विनंती कापसेकडे केली. त्यावेळी तडजोडीअंती प्रतिगट दहा हजार, असे चार गटांचे चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी कापसेने केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहायक अधीक्षक नारायण न्याहाळदे आणि उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, कर्मचारी एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांच्या पथकाने सोमवारी (दि.२७) सकाळी ११.३० च्या सुमारास सीबीएसजवळील भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचून संशयित नीलेश कापसे यास लाच घेताना पकडले. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या घराची झडती, कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू होते. भूमिअभिलेखमधील तत्कालीन प्रभारी उपसंचालक एम. एम. शिंदे याच्यासह लिपिकास ३१ जानेवारीला रात्री नऊनंतर शासकीय कार्यालयातच एक लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली होती. त्यानंतर महिनाभरातच दुसऱ्यांदा सापळा लावून लिपिकास ४० हजार रुपयांची लाच घेताना पकडल्याने भूमिअभिलेखमधील भ्रष्टाचाराची पाळेमुळे कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कापसे हा तक्रारदाराकडून दाेन लाख रुपये लाच घेण्यासाठी महिनाभरापासून प्रयत्नात हाेता. त्याने २७ जानेवारीला ४० हजारांची लाच मागितली हाेती. तसेच तक्रारदाराला गेल्या महिनाभरापासून वेगवेगळी कारणे देऊन वेळकाढूपणा करत हाेता. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिनाभर प्रतीक्षा करीत २७ फेब्रुवारीला सापळा रचून कापसेला लाच घेताना रंगेहाथ पकडले.

हेही वाचा:

Back to top button