आमदार कांदेंबाबतच्या वादाला माझ्याकडून पूर्णविराम : पालकमंत्री छगन भुजबळ | पुढारी

आमदार कांदेंबाबतच्या वादाला माझ्याकडून पूर्णविराम : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीमध्ये एकत्र असताना शिवसेना आमदाराकडून होणारे वैयक्तिक आरोप योग्य नसल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगत कांदे यांना आपण सहकार्य करणार असून, यापुढे आपल्यासाठी हा विषय संपल्यात जमा असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. मी कुणालाही धमकी देत नाही. मात्र विनंती जरूर करू शकतो, असे म्हणत आमचे मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

शिवसेना आमदार सुहास कांदे पत्रकार परिषद घेत भुजबळांवर अनेक आरोप केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा राग ठाकरे कुटुंबियांना नाही, मग यांनाच एवढा राग का येतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांना योग्य वाटल्यास ते पालकमंत्री बदलतील, असे सांगत कोणत्याही निर्णयासाठी मी तयार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. नांदगावला ४५ कोटी रूपये निधी दिला गेला आहे, अशी माझी माहिती आहे. यावर्षी केवळ १० टक्के निधी आला आणि हा निधीदेखील कोरोनासाठी वापरण्याचे शासनाचे आदेश आहेत. आर्थिक वर्ष संपायला अजून सहा महिने बाकी आहे. त्यामुळे निधी आला की आपण त्यांच्या अडचणी दूर करू, असा दिलासा देण्याचा ना. भुजबळांनी प्रयत्न केला.

निधी वाटपाबाबत तपासणी होणार

विकास निधी तालुक्याला दिला जातो. कमी अधिक वाटप झाले असल्यास ते तपासले जाईल. आमदार कांदे यांनी कमी निधी मिळाल्याची तक्रार केली असून, निधी प्राप्त झाला की त्याची भरपाई केली जाईल. पालकमंत्री म्हणून सर्व तालुक्यांकडे लक्ष देणे आणि लोकप्रतिनिधींची अडचण दूर करण्याचे काम निश्चितपणे केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

आमदार कांदे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्याची चौकशी केली जाईल पण अशा पध्दतीने थेट उच्च न्यायालयात धाव घेणे योग्य नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपले मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याकडे तक्रार करावी ते मला सांगतील. महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असतांना एकमेकांवर आरोप करणे हे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्राचार्य पदवीबद्दल धन्यवाद : पालकमंत्री छगन भुजबळ

आमदार कांदे यांनी भुजबळ हे भाई युनिर्व्हसिटीचे प्राचार्य असल्याच्या केलेल्या आरोपास उत्तर देताना त्यांनी मला चांगल्या पदावर बसवल्याबद्दल आपण त्यांचे आभारी असल्याचे सांगितले. २०१५ साली भाजपचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी चौकशी केली. त्यात काही सापडले नाही. म्हणून पुढे काही झाले नाही. अक्षय निकाळजे यांनी पत्रकार परिषद घेत कांदेंविषयी खुलासा केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला एकत्र काम करायचे आहे. त्यामुळे हे वाद थांबले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button