नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सरकारला किंवा प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारले की, धाडी टाकण्याचे आणि अटक करण्याचे उद्याेग भाजपकडून सुरू असून, एकंदरीत न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमांचे गळे घोटण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बीबीसीवरील धाडसत्राच्या पार्श्वभूमीवर केला.
खा. राऊत नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशाची लोकशाही संकटात आहे. ज्या देशात अशा प्रकारचे वर्तन वृत्तपत्राबाबत कधी घडल्याचे स्मरणात नाही. आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांवर बंधने लादण्यात आली होती. त्यावेळी याच भारतीय जनता पक्षाने जेलभरो केले असेल आणि त्यांचे सरकार असताना न्यायपालिका, वृत्तपत्र असो की सर्व प्रसारमाध्यमांचा गळा घोटण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. राहुल गांधी आणि मी सभागृहात सरकारला प्रश्न विचारले. राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आली. तर मला अटक करण्यात आल्याचे उदाहरण ताजे आहे. बीबीसीने डॉक्युमेंटरी केली आणि मुंबई, दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्याकडे खा. राऊतांनी लक्ष वेधले.
अदानी यांनी अनेक माध्यमे विकत घेतली आहेत, असे असताना तुम्हाला भीती कसली? तुम्ही आमचे गळे दाबून तुरुंगात टाकून कोणत्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात, असा प्रश्नही खा. राऊत यांनी उपस्थित केला. पंडित नेहरूंपासून ते राजीव गांधींपर्यंत एक मधला थोडा काळ वगळला तर कोणत्याही राजवटीत या देशात अशा प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्याबाबत अघोरी कृत्य घडले नसावे. या देशातील लोकशाहीसंदर्भात जगात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी भीतीही खा. राऊत यांनी उपस्थित केली.
प्रधानमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरेंना बोहरी समाजाने आमंत्रण दिले होते. तेव्हा ते जाऊ शकले नाहीत. बोहरी समाज अनेक वर्षांपासून बाळासाहेबांशी जोडला गेला आहे. त्यामुळे त्यासंदर्भात शंका घेणे योग्य नाही. उध्दव ठाकरे त्यावेळी गेले नाही. आता स्वतंत्र गेले एवढेच, अशी प्रतिक्रियाही खा. राऊतांनी व्यक्त केली.
त्यांच्या पायाखालची जमीन सरकली
अमित शहा पुण्यात निवडणुकीसाठी येणार आहेत. म्हणजेच भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होईल. विधान परिषद निवडणुकीत एखादी जागा वगळता सर्वच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. हजारो शिक्षकांनी व पदवीधरांनी त्यांचा कल स्पष्ट देत भाजपला नाकारले आहे. तोच कौल कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीत दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
न्यायपालिका त्यांच्या खिशात
उदय सामंत यांनी निकाल आमच्या बाजूने लागेल असे म्हटले. नारायण राणे यांनीदेखील म्हटले की, धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळेल. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडवणीसही बोलले की या प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागेल. हे सर्व पाहता जणू न्यायपालिका आपल्या खिशात आहे की काय अशा पध्दतीने भाजपकडून बोलले जात असल्याकडे लक्ष वेधत आम्ही असे काही बोलणार नाही कारण आमचा न्यायपालिकेवर विश्वास असल्याचे खा. संजय राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा :