महाराष्ट्राचे ‘खजुराहो’ मोजतेय अखेरच्या घटका | पुढारी

महाराष्ट्राचे 'खजुराहो' मोजतेय अखेरच्या घटका

दीपक श्रीवास्तव : नाशिक पुढारी वृत्तसेवा 

धोडंबे हे नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील अतिशय छोटेसे खेडे गाव आहे. इतिहास प्रसिद्ध धोडप किल्ला, चांदवडचा किल्ला, वणी, सप्तशृंगी गड, वडनेर भैरव, वडाळीभोई, कांचन बारी हे सर्व धोडंबे गावच्या पंचक्रोशीत येतात. अशा या धोडंबे गावात भगवान शंकराचे एक प्राचीन मंदिर आहे. श्री वटेश्वर मंदिर, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे शेकडो वर्ष जुने असलेल्या या मंदिराच्या सर्व भिंती दगडी असून संपूर्णपणे नक्षीकाम आणि विविध आकर्षक दगडांवरील कोरीव शिल्प कृतींनी पायापासून शिखरापर्यंत गच्च भरलेल्या आहेत. अगदी काही इंचापासून ते काही फुटांपर्यंत लहानमोठ्या आकारांची ही शिल्पे आपल्याला बघायला मिळतात.

ऊन वारा पाऊस यामुळे या शिल्पाकृतींचे जितके नुकसान झाले नसेल त्याच्यापेक्षा शेकडोपटीने जास्त नुकसान विकृत मानसिकतेमुळे झाल्याचे येथे दिसून येते. मानवी संस्कृतीचा समृद्ध वारसा असलेल्या या मूर्ती पैकी काही मूर्ती या खजुराहोतील मुर्त्यांप्रमाणेच निर्वस्त्र किंवा मैथुनावस्थेतील असल्यामुळे प्राचीन काळापासून त्याची मोडतोड होत आलेली असावी यात शंका नाही.

या प्राचीन भव्य दिव्य मंदिराची अवस्था आज अत्यंत दयनीय केविलवाणी अशी झालेली आहे. देश विदेशातून लोक खजुराहो अजिंठा येथील शिल्पाकृती बघायला जातात. अगदी त्याच दर्जाचे असणारे धोडंबे येथील वटेश्वर मंदिर हे दगडामध्ये कोरलेल्या अक्षरश: हजारो कोरीव मुर्त्यांनी सजलेले आहे. प्राचीन भारतीय शिल्पकलेचा हा समृद्ध वारसा नागरिकांच्या अज्ञानामुळे आणि पुरातत्त्व खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नष्ट होण्याची वेळ आलेली आहे.

या शिल्पकृतीमधील 90 टक्के शिल्पांची मोठ्या प्रमाणात झीज किंवा मोडतोड झालेली दिसून येत आहे. मात्र अजूनही बऱ्याच मूर्ती या सुस्थितीत असल्याने पुरातत्व खात्याने तातडीने लक्ष देऊन या संपूर्ण परिसराचे संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत हे पुरातन सांस्कृतिक वैभव जपण्याची गरज असताना मंदिराच्या आजूबाजूला असलेली अस्वच्छता, पुरातन वस्तूंच्या देखरेख संरक्षण आणि संवर्धनासाठी कसलेही व्यवस्था नसणे अतिशय दुःखदायक आणि धक्कादायक आहे. मंदिरावर मोठ्या प्रमाणात झाडे उगवलेली असून गांधील माशांनी व मधमाशांनी येथे ठाण मांडलेले आहे.

स्त्री पुरुष समागमाची शिल्पे

या मुर्त्यांचे बारकाईने निरीक्षण केले असता लक्षात येते की प्राचीन काळाच्या आरोग्य विषयक गोष्टी या शिल्पांमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला असावा. विशेष करून प्रजोत्पत्ती हा विषय प्रामुख्याने हाताळलेला असावा असे जाणवते. कारण काही शिल्पे ही स्त्री पुरुष समागमाची आहेत तर काही शिल्पे ही गरोदर स्त्रीची आहेत. काही शिल्पांमध्ये राज घराण्यातील त्या सुंदर स्त्रीला आरोग्य सेवा देणारी दासी ही नग्नावस्थेत काही उपचार करीत असल्याचे दिसून येते.

या दगडी शिल्पांमध्ये नरसिंह अवताराकडून हिरण्यकश्यपूचा झालेला वध, मत्स्य अवतार व कुर्म अवतारावर बसलेली सुंदर स्त्रीच्या रूपातील पृथ्वी माता, हातांमध्ये विविध शस्त्र घेऊन आणि हत्ती घोडे यावर बसून युद्धाला सज्ज झालेली देवता सुद्धा येथे दिसून येते, जास्त शिल्पे ही स्त्रीप्रधानच असल्याचे जाणवते. त्यावरून त्या काळामध्ये स्त्रियांचा दर्जा खूप उंच होता हे लक्षात येते. अशाच अनेक पौराणिक गोष्टींचे या ठिकाणी कोरीव काम झालेले आढळून येते.

अनेक मूर्ती तथागत गौतम बुद्धाशी जुळणा-या

काही शिल्पांमधील चेहरे हे बौद्धकालीन लेण्यांमधील गौतम बुद्धाच्या चेहऱ्याप्रमाणे सुद्धा असल्याचे लक्षात येते. संपूर्ण मंदिर हे वेरूळ मधील कैलास लेण्यांप्रमाणे एका दगडात कोरलेले नसून वेगवेगळ्या दगडांवर काम करून नंतर स्थापित असल्याचे देखील काही ठिकाणी जाणवते.

या संपूर्ण शिल्पांची काटेकोर व शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद घेतली जाऊन यापुढील काळात या शिल्पांचे कसलेही नुकसान होणार नाही याची काळजी पुरातत्व विभाग आणि नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. इतिहास तज्ञांनी या परिसराचा आणि मूर्ती कलेचा धांडोळा घेऊन जास्तीत जास्त माहिती संकलित करण्यासाठी मोहीम हाती घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.

धोडंब्याला जाण्याचा मार्ग

१ ) नासिक चांदवड मार्गावरील वडाळीभोई येथे उतरून खाजगी वाहनाने जाता येते. साधारणपणे ७/८ किलोमीटर.
२ ) वणी येथून ही धोडंबे जाण्याचा जवळचा मार्ग आहे. अंतरजवळपास १० किमी
३) देवळे येथून कांचनबारी / भाबडबारीओलांडल्या नंतर सोग्रस मार्गावरील शेलू किंवा खेलदरी येथून पुरी, कानमंडाळे मार्गे धोडंबे जाता येते. किंवा सोग्रस फाटा येथून वडाळी भोई मार्गे देखील धोडंबे गाठता येते.
धोडंबे साठी बससेवा अपुरी असल्याने वणी व वडाळीभोई येथून खासगी काळी पिवळी जीप रिक्षा मिळू शकते. स्वतः चे दुचाकी चारचाकी वाहन असल्यास उत्तम. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कृपेने रस्ता सध्यातरी छान आहे.

धोडंबे गावातील शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले हेमाडपंथी रचना असलेले श्री वटेश्वर मंदिर शासन स्तरावर दुर्लक्षित झाल्यासारखे वाटते. मंदिरावर कोरीव काम केलेल्या मूर्तींची बरेच तोडमोड झालेली आहे. अतिशय दुर्मिळ असलेला हा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष घालावे.
– डॉ.नितीन शाहीर (धोडांबे)

हेही वाचा :

 

Back to top button