नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार | पुढारी

नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेने २३ वर्षांपूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी गंगापूर धरणातून टाकलेल्या जुन्या सिमेंटच्या जलवाहिनीला वारंवार गळती होत असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी गंगापूर धरणातून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र अशी साडेबारा किमी लांबीची लोखंडी जलवाहिनी टाकण्यात येणार असून, त्यासाठी २११ कोटींचा प्रकल्प मनपाने हाती घेतला आहे.

केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून १८०० मिमी व्यासाची नवी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या प्रस्तावाची तांत्रिक छाननी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्याकरिता मजिप्राला एक कोटी ८६ लाख रुपयांचे शुल्क अदा करण्यात येणार असून, तो प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. गंगापूर धरणावरील पंपीग स्टेशन ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट दोन सिमेंटच्या जलवाहिनी १९९७ ते २००० या कालावधीत टाकण्यात आल्या आहेत. २०२१ पर्यंतच्या अंदाजित लोकसंख्येला पाणी पुरवठ्यासाठी या थेट जलवाहिनीची रचना करण्यात आली होती. गेल्या २३ वर्षांत या सिमेंटच्या जलवाहिनीची वहन क्षमता कमी झाली आहे. २०२३ च्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करण्यासाठी ही जलवाहिनी सक्षम नसून, वारंवार गळती होत आहे. त्यामुळे गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान ४०० एमएलडी क्षमतेची १२.५० किमी लांबीची १८०० मिमी व्यासाची नवी लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय मनपाने घेतला. यासाठी वित्त आयोगाचा निधी मंजूर असून, प्रकल्पासाठी २०९ कोटी ६० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारासाठीही १.०९ कोटींचा खर्च होणार आहे. या प्रस्तावाला महासभेने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत करण्यात येऊन तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. आता मनपाने तांत्रिक तपासणीकरिता प्रस्ताव मजिप्राकडे पाठविला आहे.

नव्या जलवाहिनीचे खास मुद्दे

– गंगापूर धरण ते बारा बंगला अशी असेल १२.५० किमीची जलवाहिनी

– ४०० एमएलडी क्षमता आणि १८०० मिमी व्यासाची जलवाहिनी

– केंद्राच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून योजना साकारणार

– २०४१ च्या पाणी आरक्षणानुसार जलवाहिनीची क्षमता असेल

हेही वाचा :

Back to top button