नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या | पुढारी

नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
किमान वेतनासह प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ वॉटरग्रेस कंपनीच्या कामगारांनी मंगळवारी (दि. 24) कचरा भरलेल्या घंटागाड्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. ठेकेदाराने आठ तासांच्या किमान वेतनासह नियमानुसार महागाई भत्ता द्यावा, या प्रमुख मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

मालेगाव महानगरपालिकेने शहर स्वच्छतेचा ठेका दिला आहे. काही वर्षांपासून वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स ही वादग्रस्त कंपनी हा ठेका चालवत असून, त्याविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. शहरवासीय, लोकप्रतिनिधींच्या तक्रारीच्या सुरानंतर आता या ठेकेदाराच्या कामगारांनीही न्याय्य हक्कासाठी लढा पुकारला आहे. ठेक्याच्या करारनाम्यानुसार कामगारांना सेवा – सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही ठेकेदार व प्रशासन दाद देत नसल्याने मंगळवारी शहरभरातील कचरा घंटागाडीत भरून कामगारांनी महापालिकेवर धडक दिली. प्रवेशद्वारावर ठाण मांडत मनपा आयुक्त व वॉटरग्रेस कंपनी प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. दि. 21 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांनी आठ दिवसांत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यास महिना उलटूनही कामगारांचे प्रश्न जैसे थे असल्याचा रोष यावेळी व्यक्त करण्यात आला.

मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या
कामगारांना राज्य शासनाने निश्चित केलेले किमान वेतन व वेळोवेळी देण्यात येणारा महागाई भत्ता याप्रमाणे 8 तास कामाचे वेतन त्वरित लागू करावे. सन 2021 – 22 चा बोनस त्वरित अदा करावा. पीएफ व ईएसआयसी त्वरित लागू करावे. कामगारांना साप्ताहिक सुटी, सणाच्या भरपगारी सुट्या तसेच पीएलसीएल व एसएल त्वरित लागू करावी. घंटागाडी कामगारांचा पगार त्यांच्या बँक खात्यावर जमा करावा आदी मागण्या प्रलंबित आहेत. त्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेचे जिल्हा सचिव तुकाराम सोनजे, तालुकाध्यक्ष रमेश जगताप, तालुका सचिव अजहर खान, तालुका सदस्य पंकज सोनवणे यांनी सागितले.

हेही वाचा:

Back to top button