नाशिक : मनपातील बदल्यांच्या संगीत खुर्चीचा अर्थ अनाकलनीय | पुढारी

नाशिक : मनपातील बदल्यांच्या संगीत खुर्चीचा अर्थ अनाकलनीय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाचा सावळा गोंधळ काही थांबता थांबत नसल्याने प्रशासनाच्या कामकाजाविषयीच आता अनेक शंका-कुशंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. प्रशासकीय बदल्यांच्या नावाखाली महापालिकेत बदल्यांच्या संगीत खुर्चीचा खेळ रंगत असल्याने या मागील अर्थ मात्र अनाकलनीय आहे. यामुळे या बदल्यांमागे कुणाचे हितसंबंध जोपासले जात आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कर्मचारी वा अधिकाऱ्यांचे एकाच जागेवर किंवा एकाच टेबलवर वर्षानुवर्षे बस्तान हाेऊन त्यांचे हितसंबंध निर्माण होऊ नये, याकरता दरवर्षी विनंती किंवा प्रशासकीय बदल्या साधारणपणे एप्रिल मे महिन्यात प्रस्तावित केल्या जातात. किमान तीन वर्षे आणि त्यापुढील कालावधी हा बदल्यांसाठी ग्राह्य धरला जातो. मात्र, नाशिक महापालिकेत पाच वर्षे आणि त्याहून अधिक कालावधी होऊनही एकाच जागी ठाण मांडून असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून हात लावला जात नाही. मात्र, दुसरीकडे कोणत्याही प्रकारची विनंती न करताच काही कर्मचारी, अभियंत्यांच्या बदल्या केल्या जात असल्याने प्रशासन विभागाच्या कामकाजाविषयीच संशय निर्माण होत आहे. बुधवारी (दि.१८) प्रशासन विभागाने एका सहायक कनिष्ठ अभियंत्यासह दोन शिपायांच्या प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सोयीचे या नावाखाली बदल्या केल्या. परंतु, संबंधितांविषयी कोणत्याही प्रकारचा आक्षेप नसताना केवळ पंचवटी विभागातील एका शाखा अभियंत्यांच्या सोयीसाठी बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

बदलीमागील सोय कुणाची?

बदली झालेला सहायक कनिष्ठ अभियंता गुणनियंत्रण विभागात कार्यरत होता. त्यास ड्रेनेज विभागात बदलीने नेमणूक करण्यात आली आणि गुणनियंत्रण विभागात पंचवटी विभागातील शाखा अभियंत्याची वर्णी लावण्यात आली. वास्तविक संबंधित शाखा अभियंत्याची बदली ड्रेनेज विभागात करता आली असती. परंतु, तसे न करता प्रशासनाने केवळ सोयच पाहिली. परंतु, नेमकी कुणाची सोय झाली असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या आधीदेखील सेवानिवृत्तीस काहीच महिने शिल्लक असताना नगर रचना विभागातून महिवाल नामक अभियंत्याची नाशिकरोड विभागीय कार्यालयात बदली करण्यात येऊन त्या जागेवर नाशिकरोड येथील अभियंत्याची सोय करण्यात आली होती.

पंचवटीतील शाखा अभियंत्याच्या बदलीचा प्रस्ताव आलेला होता. हा जुना प्रस्ताव होता. तो प्रलंबित होता. त्यामुळे त्यावर आता कार्यवाही होऊन बदली करण्यात आली. तसेच घनकचरा विभागात दोन शिपाई अतिरिक्त असल्याने त्यांचीही अन्य ठिकाणी बदली केली आहे.

– मनोज घोडे-पाटील, उपआयुक्त, प्रशासन विभाग

हेही वाचा :

Back to top button