नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अवैध धंद्यांपाठोपाठ पाेलिसांनी अनैतिक देहविक्री व्यवसायाविरोधात मोर्चा वळविला आहे. शहरातील हायप्रोफाइल स्पा, हॉटेल्सनंतर आता भरवस्तीत देहविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आल्याने पोलिसांनी कुंटखानेचालकांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. उपनगर, पंचवटी, अंबड आदी परिसरांत छापेमारी करीत परराज्यातील पाच आणि शहरातील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी सहा संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
मध्यवर्ती गुन्हे शाखेचे कर्मचारी संदीप पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक – पुणे रस्त्यावरील प्रियदर्शन व्हिला गेस्ट रूममध्ये कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अनैतिक देहविक्रीचा भांडाफोड करत संशयित सुभाष केदारे व सागर माने यांना अटक केली. उत्तर प्रदेश आणि आसाम राज्यातील तीन पीडित महिलांची मुक्तता केली. संशयितांनी गेस्ट रूमच्या नावाखाली घेतलेल्या भाडेतत्त्वावरील फ्लॅटमध्ये अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय थाटला होता. या फ्लॅटचे भाडे दरमहा ४० हजार असल्याचे तपासात समोर आले आहे.
पेठरोडवरील मधुबन अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर अनैतिक देहविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. महाराष्ट्र व पश्चिम बंगालमधील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. संशयित उषा प्रमोद भागवत (४२, रा. भागवत गल्ली, देवळाली गाव) आणि सरला शेखचंद बोकेफोडे (३३, रा. मधुबन अपार्टमेंट, पेठरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देहविक्री व्यापारासाठी संशयित महिला पैसे घेताना आढळून आल्या होत्या.
मुलगा अटकेत; आई फरार
उत्तमनगर परिसरातील बुरकुले हॉलच्या पाठीमागे असलेल्या धनलक्ष्मी रो-हाउसमध्ये संशयित धनंजय मधुकर मोरे (३०) याच्यासह त्याची आई निर्मला मधुकर मोरे (५३) हे दोघे महिलांकडून अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याच्या माहितीवरून अंबड पोलिसांनी छापा मारला. यात नाशिकमध्येच राहणाऱ्या २७ आणि ४१ वर्षीय दोन पीडितांची सुटका करण्यात आली. संशयित धनंजयला पोलिसांनी अटक केली आहे, तर निर्मला मोरे फरार झाल्या आहेत.