नाशिक : मनपात २८०० पदांसाठी मेगाभरती, प्रशासनाची तयारी सुरू | पुढारी

नाशिक : मनपात २८०० पदांसाठी मेगाभरती, प्रशासनाची तयारी सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाने ४० हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याने मनपा नोकरी भरतीलाही गती मिळाली आहे. यापूर्वी प्रक्रिया सुरू असलेल्या ७०६ पदांबरोबरच प्रशासकीय, लेखा व लेखा परीक्षण तसेच तांत्रिक संवर्गामधील १८०० हून अधिक पदे असे मिळून जवळपास २,८०० पदांच्या नोकर भरतीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. प्रशासकीय लेखा व लेखा परीक्षण तसेच तांत्रिक संवर्गामधील नोकर भरतीसाठी येत्या आठ दिवसांमध्ये सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली जाणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून, लोकसंख्याही २० लाखांच्या घरात पोहोचली आहे. लोकसंख्येच्या आधारे मनपाची ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गामध्ये पदोन्नती झाली आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये ‘क’ वर्ग आकृतिबंधानुसारच ७ हजार ८४ पदांपैकी साडेचार हजार अधिकारी व कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यामुळे अधिकारी – कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असून, वाढता आस्थापना खर्च, सुधारित आकृतिबंध आणि सेवा प्रवेश नियमावलीच्या अडथळ्यांमुळे रिक्त पदांची संख्या अडीच हजारांच्या पुढे गेली आहे.

मनपा अधिकारी – कर्मचाऱ्यांची होणारी दमछाक लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी नगरविकास खात्याने अत्यावश्यक विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली. मात्र, सेवा प्रवेश नियमावलीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने नोकर भरतीची प्रक्रिया रखडली होती. नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आयबीपीएस संस्थेसोबत सामंजस्य करार केला जाणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि मनपा आयुक्तांच्या बैठकीत राज्य शासनाने ४० हजार पदांच्या भरतीला हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र, नाशिक मनपात २८०० पदे रिक्त असून, त्यापैकी ७०६ पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाली आहे. उर्वरित सुमारे १८०० पदांबाबत कारवाई करणे गरजेचे असल्याचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार मनपा प्रशासनाकडून कार्यवाही केली जात आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर ७०६ मंजूर रिक्त पदांच्या नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी मनपाकडून आयबीपीएस संस्थेसमवेत सामंजस्य करार केला जाणार आहे. तर उर्वरित जवळपास १८०० पदे भरतीसाठी आवश्यक सेवा प्रवेश नियमावली तयार करून मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पुढील आठवड्यामध्ये पाठवली जाईल. तसेच लाड पागे समिती तसेच अनुकंपा तत्त्व आणि अन्य माध्यमांमधून आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येतील.

– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त

नोकर भरतीला आचारसंहितेमुळे ब्रेक

मनपा प्रशासनाने विविध पदांच्या भरतीसाठी अर्जनिहाय आकारण्यात येणाऱ्या शुल्क निश्चितीसह तसेच अर्जस्वीकृती, मुलाखती, लेखी परीक्षा आणि नियुक्तिपत्र देण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी आयबीपीएस समवेत सामंजस्य कराराची तयारी सुरू केली होती. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर करार होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button