नाशिक : महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या; वेगमर्यादा, अपघात रोखण्यासाठी ‘न्हाई’चा महत्वपूर्ण उपक्रम | पुढारी

नाशिक : महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या; वेगमर्यादा, अपघात रोखण्यासाठी ‘न्हाई’चा महत्वपूर्ण उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यासह शहरात अपघात सत्र सुरूच असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे यंत्रणांनी अपघातासह अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजनांसह रस्ते दुरुस्तीवर भर दिला आहे. त्यातील एक भाग म्हणून मुंबई-आग्रा आणि नाशिक-मुंबई महामार्गासह नाशिक-पुणे व इतर महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या आखण्यात येत आहेत. वेगमर्यादा पाळण्यासह अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (न्हाई) हे काम सुरू केले आहे.

गृहविभागाच्या आदेशानुसार राज्यात 11 ते 17 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुसार नाशिकमध्ये न्हाईने कार्यवाही सुरू केली असून, सिग्नल, ब्लिंकर्ससह जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची तपासणी सुरू आहे. आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यासह दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांतर्फे बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. महामार्गावरील वाहतूक सुरक्षेसाठी न्हाईने ब्लॅक स्पॉटसह क्रॉसिंगच्या ठिकाणी थर्मोप्लास्टिक पट्ट्यांची आखणी केली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन अपघात टळण्याची शक्यता वाढल्याचे न्हाईच्या अधिकार्‍यांनी सांगितले. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण विभागांसह इतर संस्था व संघटनातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात गृहविभागाने सूचना दिल्या असून, वाहतूक सुरक्षेसह प्रबोधनावर विशेष भर असणार आहे.

यंत्रणांकडून ही कामे अपेक्षित
वाहतूक पोलिस व परिवहन विभागाच्या वतीने चौकसभा घेत वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यास सांगितले आहे. तसेच बॅनर्स लावून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे, वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन करणे, महामार्गावरील अवजड वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, वाहतूक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबवणे, अवैध वाहतूक, नियमभंग करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) च्या वतीने ब्लॅक स्पॉटची दुरुस्ती व उपाययोजना करणे, रस्ते व महामार्गांवरील खड्डे दुरुस्ती करणे, साइनबोर्ड, माहितीफलक, सिग्नल यंत्रणा बसवणे, रस्ता दुभाजक व रिफ्लेक्टर दुरुस्ती व रंगकाम करणे, झेब्रा क्रॉसिंग, रम्बलर व थर्मोप्लास्टिक दुरुस्ती करण्याच्याही सूचना आहेत.

हेही वाचा:

Back to top button