तीन दिवसांत ३३० रुपयांनी सोने स्वस्त | पुढारी

तीन दिवसांत ३३० रुपयांनी सोने स्वस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून विक्रमी उच्चांकाकडे झेपावत असलेले सोन्याचे दर गेल्या तीन दिवसांत ३३० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी सोन्याची प्रति दहा ग्रॅमसाठी ५६ हजार ३२० रुपयांची विक्रमी नोंद झाली होती. बुधवारी त्यात किचिंत घट झाल्याने ५५ हजार ९९० रुपये दर नोंदविले गेले.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडींमुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या दिवाळीत सोन्याचे दर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ४८ हजारांपर्यंत होते. तर २२ कॅरेट सोने ४६ हजारांपर्यंत होते. मात्र, डिसेंबर २०२२ पासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने, दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. गेल्या काही दहा दिवसांचा आढावा घेतल्यास २ जानेवारी रोजी सोन्याचा दर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ५५ हजार ७० रुपये इतका होता. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत गेल्याचे दिसून आले. सोमवारी हा दर विक्रमी ५६ हजार ३२० रुपयांवर पोहोचला.

मात्र, मंगळवारी अन् बुधवारी यात किचिंत घट झाल्याचे दिसून आले. मंगळवारी सोन्याचा दर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ५६ हजार १६०, तर बुधवारी ५५ हजार ९९० रुपये नोंदविला गेला. तर २२ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ५१ हजार ३३० रुपये नोंदविला गेला. जाणकारांच्या मते, पुढच्या काळात सोने तसेच चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चांदी ७१ हजारांवर

सोन्याबरोबरच चांदीचे दरदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मंगळवारी चांदीचा दर १ किलोसाठी ७१ हजार ८०० रुपये इतका होता. बुधवारी त्यात किंचित घट झाल्याचे दिसून आले. बुधवारी १ किलो चांदीसाठी ७१ हजार ५०० रुपये इतका दर नोंदविला गेला. पुढच्या काळात चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button