नाशिक : हजारो उपस्थितीतांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा, आदित्यला अखेरचा निरोप | पुढारी

नाशिक : हजारो उपस्थितीतांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा, आदित्यला अखेरचा निरोप

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील निळवंडी येथील सैन्यदलातील जवान आदित्य अशोक जाधव यांच्या पार्थिवावर पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत मातेच्या जयघोषात आपल्या लाडक्या जवानाला अंतिम निरोप देताना उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

निळवंडी येथील आदित्य जाधव हा सैन्यदलात लडाख येथे कार्यरत होता. भारतीय लष्करात कार्यरत असताना आदित्य जाधव यांचे शनिवारी निधन झाले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निळवंडी व दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली. मंगळवारी सकाळी ८ वाजता पार्थिव मूळगावी निळवंडी येथे दाखल झाले होते. अंतिम दर्शनासाठी पार्थिव मारुती मंदिरासमोर ठेवण्यात आले होते. पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले. आदित्य जाधव यांच्या वडील व भावाचे यापूर्वीच निधन झाले आहे. आई व वहिनी, पुतणे असा त्यांचा परिवार असून, त्या परिवाराची संपूर्ण जबाबदारी आदित्यवर होती. यावेळी कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाइकांच्या आक्रोशाने सारे उपस्थित हेलावून गेले होते.

‘अमर रहे! अमर रहे! वीर जवान अमर रहे!, भारत माता की जय’ अशा विविध घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. रांगोळी काढून फुलांचा वर्षाव अंत्ययात्रेवर करण्यात येत होता. यावेळी कोलवण नदीतीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. तहसीलदार पंकज पवार, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, भाऊसाहेब पाटील, कैलास पाटील, नारायण पाटील, तुकाराम पाटील, नरेंद्र जाधव, गणेश हिरे, अमोल उगले, अक्षय पवार, सोमनाथ पताडे, कचरू गेणू पाटील, माजी सैनिक विजय कतोरे, भारत खांदवे आदींनी श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी तहसीलदार पंकज पवार, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक चेतन लोखंडे यांच्यासह निळवंडी ग्रामपंचायत प्रशासन, कर्मचारी, निळवंडी ग्रामस्थ, माजी सैनिक संघटना, विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय, सामाजिक मान्यवरसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुटुंबीयाला आर्थिक मदत

आदित्य जाधव यांच्या अंत्यसंस्कारवेळी लष्कराच्या वतीने एक लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव यांनी सदर कुटुंबीयाला आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले.

हेही वाचा :

Back to top button