सायबर सेलने ग्राहकांचे वाचवले 13 लाख रुपये | पुढारी

सायबर सेलने ग्राहकांचे वाचवले 13 लाख रुपये

नाशिक (प्रासंगिक) : योगेंद्र जोशी

आजच्या आधुनिक युगात मोबाइल ही काळाची गरज झालेली असून, बरेच आर्थिक व्यवहार मोबाइलद्वारे किंवा ऑनलाइन पद्धतीने केले जातात. परंतु ऑनलाइनच्या माध्यमातून गंडा घालत फसवणुकीचे प्रकार क्षणोक्षणी वाढत असले, तरी नंदुरबारच्या सायबर सेलने तत्काळ केलेली कारवाई आणि पाठपुरावा यामुळे विविध फसवणूक प्रकरणांतील ग्राहकांचे 13 लाख रुपये वाचले आहेत.

नंदुरबार शहरातील तक्रारदार दीपक शिंदे यांचे SBI Yono अ‍ॅप्लिकेशन हे 5 जानेवारी 2022 रोजी सुरू होत नव्हते. त्यामुळे त्यांनी गुगलवर जात एसबीआय कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्या नंबरवर तक्रारदाराने संपर्क साधला असता, त्यांनी तक्रारदारास एनीडेस्क अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगून तक्रारदाराच्या मोबाइलचा ताबा घेतला. काही क्षणांत तक्रारदाराच्या खात्यातून सव्वाचार लाख रुपये ऑनलाइन कपात करून त्यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर सेलमध्ये स्वत: जाऊन ऑनलाइन सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली. सायबर सेलच्या पोलिस अधिकार्‍यांनी तत्काळ संबंधित वॉलेट आणि बँकेशी समन्वय साधत फसवणूक झालेली रक्कम गोठवून ती परत तक्रारदाराच्या खात्यात परत मागवण्याची कारवाई ई-मेलद्वारे केली. त्यामुळे सव्वाचार लाखांपैकी दीड लाखाची रक्कम तत्काळ वाचविण्यात यश आले व अन्य दीड लाख लाभधारी खातेधारकाच्या बँक खात्यात गोठवली. ही रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार परत मिळणार आहे. अशा रीतीने शिंदे यांचे तीन लाख रुपये वाचविण्यात आले. नवापूर येथील विकास शहा 18 ऑक्टोबर 2022 रोजी घरी असताना त्यांना लाइट बिल हे 11 रुपयांनी कमी भरलेले असल्याचा कॉल आला होता. त्यांनी मोबाइलवर आलेली लिंक ओपन केली असता, त्यांच्या खात्यातून 2 लाख 98 हजार रुपये ऑनलाइन कपात झाल्याचा मेसेज आला. त्यांनी लगेच नवापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर नंदुरबारच्या सायबर सेलने संबंधित वॉलेट/बँकेशी तत्काळ समन्वय साधून फसवणूक झालेली रक्कम गोठवून ती परत तक्रारदार यांच्या खात्यात परत मागवण्याची कारवाई ई-मेलद्वारे केली. शहा यांची सर्व रक्कम वाचली आणि खात्यात पुन्हा परत वळवण्यात आली. ही कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलिस हवालदार दीपक चित्ते व पोलिसनाईक पंकज महाले, कन्हैया पाटील, चंद्रशेखर बडगुजर, हितेश पाटील, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने बजावली आहे.

तत्काळ तक्रार महत्त्वाची…
सन 2022 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रकारच्या फसवणूक झालेल्या 36 पेक्षा अधिक लोकांनी तत्काळ सायबर पोर्टल www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्यावर सायबर पोलिस ठाणे नंदुरबार येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी संबंधित मोबाइल वॉलेट, बँक यांच्या संबंधित नोडल अधिकार्‍यांशी समन्वय साधून व वेळोवेळी पाठपुरावा करून तक्रारदारांचे फसवणूक झालेले एकूण 13 लाख 46 हजार 648 रुपये परत मिळवून दिले. त्या सर्व तक्रारदारांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक, पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह सायबर सेलचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर व पथकाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आहे. एखाद्याला सायबर चोरट्यांनी फसवून त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतल्यास तत्काळ पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन सायबर सेलने केले आहे.

हेही वाचा:

Back to top button