नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव | पुढारी

नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागाबरोबरच सिडको विभागात 200 खाटांचे रुग्णालय उभे राहणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव मनपाच्या वैद्यकीय विभागाने तयार केला आहे. त्यासाठी नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यामुळेच प्रस्ताव तयार झाले असून, दोन्ही रुग्णालयांसाठी सुमारे 110 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जागा निश्चितीनंतर केंद्र, राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला जाईल.

महापालिकेची नाशिक शहरात नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय तसेच जुने नाशिक येथे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, सिडकोत मोरवाडी रुग्णालय तसेच पंचवटी विभागात इंदिरा गांधी रुग्णालय अशी चार रुग्णालये आहेत. यापैकी पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात सध्या जनरल ओपीडीबरोबरच प्रसूती शस्त्रक्रिया, बालरुग्ण विभाग, लसीकरण अशी कामे केली जातात. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये लाखो भाविक येत असल्याने पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय अपुरे पडते. त्यामुळे या भागात रुग्णालय असावे तसेच इंदिरा गांधी रुग्णालयाची इमारत जुनी असल्याने आपत्कालीन उपचार देणे शक्य होणार नाही. त्यामुळे आमदार अ‍ॅड. ढिकले यांनी मालेगाव स्टॅण्ड येथील मनपाच्या जागेवर रुग्णालयाचा प्रस्ताव मनपाला दिला होता. पालकमंत्री दादा भुसे यांनी मनपाच्या आढावा बैठकीत पंचवटी आणि सिडको येथे दोन रुग्णालये उभारण्याची घोषणा केली होती. याबाबत त्यांनी जिल्हा नियोजन समितीतही प्रस्ताव तयार करण्याचे तसेच जागा निश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्या अनुषंगाने आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वैद्यकीय विभाग व नगर रचना विभागाला दिलेल्या सूचनेनुसार वैद्यकीय विभागाने जागेची पाहणी केली. तसेच त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. दोन लाखांहून कमी लोकसंख्या असल्यास कमीत कमी 50 व 15 अत्यावश्यक असे 65, तर किमान 100 बेडच्या रुग्णालयाची आवश्यकता असते. दोन ते पाच लाखांपर्यंत लोकसंख्या असल्यास 100 व 125 किंवा जास्तीत जास्त 200 खाटांचे रुग्णालय होऊ शकते. तर पाच ते 10 लाखांपर्यंत लोकसंख्या असल्यास 300 बेडचे रुग्णालय आवश्यक असते. पंचवटी व सिडको विभागातील लोकसंख्या दोन लाखांपेक्षा अधिक असल्याने त्या ठिकाणी प्रत्येकी 100 खाटांचे रुग्णालय साकारले जाऊ शकते.

रुग्णालयांसाठी पदभरतीही होणार
सिडको आणि पंचवटीत नव्याने रुग्णालये निर्माण झाल्यास त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळही उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार 25 विशेष तज्ज्ञ, 39 वैद्यकीय अधिकारी, 224 स्टाफ नर्स, 68 तांत्रिक, 24 प्रशासनिक, 10 डाटा एंट्री ऑपरेटर, 60 वॉर्डबॉय, 48 आया यांचे मनुष्यबळ मिळावे, यासाठी पदभरती करावी लागणार असून, त्यासाठी वार्षिक 35 कोटी 13 लाख 49 हजार रुपयांचा निधी खर्च होणार आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पंचवटी विभागात रुग्णालयासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. त्याचबरोबर मनपाने तयार केलेला प्रस्ताव तत्काळ सादर होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना स्वस्तात चांगले उपचार मिळावे, यादृष्टीने रुग्णालय उभारण्यात येणार आहे. – अ‍ॅड. राहुल ढिकले,  आमदार, भाजप.

हेही वाचा:

Back to top button