नाशिक : चाळीतले उद्योग : उपनगरांमध्ये पत्राचाळी; अतिक्रमण जागोजागी | पुढारी

नाशिक : चाळीतले उद्योग : उपनगरांमध्ये पत्राचाळी; अतिक्रमण जागोजागी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विनापरवानगी अतिक्रमण करून शहरातील बहुतांश उपनगरांमध्ये पत्राचाळ उभारली जाताना दिसत आहे. पत्र्याचे हे शेड भंगार व्यावसायिकांसह इतर व्यवसायासाठी भाड्याने दिले जात आहे. विशेष म्हणजे व्यवसाय उभारताना कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेतल्या जात नाहीत. शिवाय अतिक्रमण करून बांधकाम केले जात असताना मनपा प्रशासन याकडे डोकेझाक करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उपनगरांमध्ये जागामालकांकडून सध्या पत्र्याचे शेड उभारण्याचा जणू काही धडाकाच लावला आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना शेड भाड्याने देता यावे यासाठी जागामालकांकडून अतिक्रमण करून शेड उभारले जाते. शिवाय व्यसायासाठी शेड भाड्याने देताना कोणत्याही स्वरूपाचा भाडेकरार केला जात नाही. तसेच या शेडमध्ये कोणता व्यवसाय उभारला जाईल, याचा तपशील घेण्याची तसदीदेखील शेडमालक घेत नाहीत. त्यामुळे भाडेकरूदेखील बिनधास्तपणे या ठिकाणी विनापरवानगी व्यवसाय सुरू करतात. बऱ्याचदा या व्यवसायामुळे परिसराला बकालपणाचे स्वरूप येते. शिवाय परिसरात गुन्हेगारी वाढण्यासदेखील हे व्यवसाय कारणीभूत ठरताना दिसत आहे.  या सर्व प्रकाराकडे महापालिका मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईचे कोणत्याही स्वरूपाचे सोपस्कार पार पाडले जात नसल्याने गेल्या काही काळापासून पत्राचाळी उभारण्याचा जणू काही सपाटाच लावला.

हेही वाचा:

Back to top button