Nashik Igatpuri : भीषण स्फोटानंतर जिंदाल प्रकल्प काही काळ बंद, एमपीसीबीचे आदेश | पुढारी

Nashik Igatpuri : भीषण स्फोटानंतर जिंदाल प्रकल्प काही काळ बंद, एमपीसीबीचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरीतील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील भीषण स्फोटानंतर तेथील प्रकल्प बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) कंपनीला बजावले आहे. प्रकल्पामध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांसह अन्य सुविधांच्या पुनर्उभारणीनंतरच प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. त्यामुळे सदर प्रकल्प काही काळ बंद राहणार आहे. कंपनीने घटनेचा अहवाल सादर केला असून, त्याची पडताळणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नववर्षाच्या प्रारंभी जिंदाल कंपनीत झालेल्या बॉयलरच्या स्फोटामूळे अवघा जिल्हा हादरून गेला. या घटनेत दोघा युवतींना जीव गमवावा लागला असून, १७ कामगार जखमी झाले आहेत. घटनेच्या दोन दिवसांनंतरही कंपनीमधून धुराचे लोट बाहेर पडत आहे. सदर घटनेनंतर एमपीसीबीने जागेवर जाऊन पाहणी करताना कंपनी प्रशासनाला पत्रच धाडले आहे. सदर पत्रात प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच भविष्यात प्रकल्प सुरू करताना प्रदूषणासह अन्य सर्व परवानगी घेतल्यानंतरच तो कार्यान्वित होऊ शकेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काही महिने तरी जिंदालचा प्रकल्प बंद राहणार आहे.

जिंदाल कंपनीने सोमवारी (दि.२) घटनेबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालानुसार घटनेच्या वेळी कंपनीच्या परिसरात ७४९ कामगार कार्यरत हाेते. तर घटनेच्या ठिकाणी व तेथील बाजूचे दोन असे तिन्ही प्रकल्प मिळून ६० कामगार तेथे उपस्थित असल्याचे अहवालात दिले आहे. कंपनी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सध्या एकच कामगार बेपत्ता आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, कंपनीच्या या अहवालाची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी यांच्या अध्यक्षतेत समिती नेमली असून, त्याच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जिंदाल कंपनीला मंगळवारी (दि. ३) भेट देत पाहणी केली. यावेळी तेथील वास्तव्यास असलेले कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच आपल्यापैकी कोणी अद्यापही बेपत्ता असल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळवावी, अशा सूचना केल्या. आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी मास्क घालावा. तसेच शक्य असल्यास पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावे.
– गंगाथरन डी., जिल्हाधिकारी

येथे साधावा संपर्क
जिंदाल दुर्घटनेदरम्यान कंपनीत उपस्थित असलेल्या परंतु अद्यापही संपर्क न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी संबंधित बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याच्या तपशिलासह इगतपुरी तहसील कार्यालय 02553-2440009 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण (मो. 8108851212), तहसीलदार परमेश्वर कासुळे (मो. 9604075535), निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे (मो. 9850440760), महसूल सहायक नितीन केंगले (मो. 9767900769) आदींशी संपर्क साधावा, असे कासुळे यांनी कळविले आहे.

८३ कर्मचाऱ्यांचा संपर्क नाही

तालुक्यातील माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. ३) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कंपनीत ६ ते ७ हजार कामगार असून, त्यापैकी चार हजार कामगार कंपनी परिसरात राहतात. उर्वरित कामगार आसापासच्या गावात राहतात. तर घोटीत ७०० कामगार वास्तव्यास असून, त्यापैकी ८३ कामगारांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्याचा दावा शिष्टमंडळाकडून करण्यात आला. मृत कामगारांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत कंपनीकडून मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनिल ढिकले, रघुनाथ टोकडे, कुंडलिक जमधडे, तानाजी टोकडे, गोविंद जाधव यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button