पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन | पुढारी

पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता तालुका स्तरावर पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावरही प्रशासनाने आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केला आहे.

पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजला असून, दि. ३० जानेवारीला मतदान पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच आयोगाने आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. आयाेगाच्या निर्दशानुसार प्रशासनाने जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये तीन प्रकारची पथके तैनात करण्यात आली आहेत. तालुका स्तरावर तैनात करण्यात आलेली तिन्ही पथके तहसीलदारांच्या नियंत्रणात कार्यरत असतील. त्यामध्ये नियमित पथकासह छायाचित्रण व अन्य एक पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकांमार्फत दाखल तक्रारींसह तालुक्यांच्या ठिकठिकाणी अचानक भेटी देत तपासणी करण्यात येणार आहे. सध्या ही पथके कार्यरत असली तरी ५ जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून या पथकांचे कामकाज वाढणार आहे. दरम्यान, तालुका स्तरावरील पथकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या नियंत्रणात हा कक्ष कार्यन्वित असेल.

येथे नोंदवा तक्रार…
जिल्ह्यात आचारसंहितेचा कोठे भंग होत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात तक्रार नोंदविता येणार आहे. त्यासाठी ०२५३-२३१६००९ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button