नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात मतदारकार्ड हे आधारशी जोडणी मोहिमेंतर्गत 21 लाख 86 हजार 503 मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असून, हे प्रमाण 47 इतके आहे. निवडणूक शाखेमार्फत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत येवल्यातून सर्वाधिक आधार हे मतदार कार्डशी जोडले गेले आहेत. यादीत नाशिक पश्चिम मतदारसंघ तळाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण केले जात असून, त्या अंतर्गत प्रथमत: मतदारांचे छायाचित्र हे याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्याचा पुढील टप्पा म्हणजे मतदारकार्ड हे आधारशी जोडण्याची मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम संपूर्णपणे ऐच्छिक असली, तरी जिल्ह्यातून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून बीएलओंमार्फत घरोघरी जाऊन या मोहिमेबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच मतदारांकडून 6 ब अर्जदेखील भरून घेण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 15ही विधानसभा मतदारसंघांत एकूण 45 लाख 93 हजार 823 मतदार आहेत. आतापर्यंत 21 लाख 86 हजार 503 मतदारांनी त्यांचे आधारकार्ड हे मतदारकार्डशी जोडण्यासाठी प्रशासनाकडे 6 ब अर्ज भरून दिला आहे. अद्यापही 24 लाख 7 हजार 320 मतदारांनी त्यांचे आधार हे मतदारकार्डशी जोडलेला नाही. शहरी भागापेक्षा ग्रामीणमधून अधिकाधिक नागरिक हे या मोहिमेत सहभाग नोंदवित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मतदारकार्डला आधार जोडल्यामुळे भविष्यात मतदार याद्या अधिक अचूक होण्यास मदत मिळेल. मात्र, निवडणुकांवेळी बोगस मतदानाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
मतदारकार्ड-आधार जोडणी
नांदगाव : 1,76,580, मालेगाव मध्य : 1,28,600, मालेगाव बाह्य : 1,25,950, बागलाण : 1,76,656, कळवण : 1,67,810, चांदवड : 1,52,056, येवला : 1,96,684, सिन्नर : 1,68,318, निफाड : 1,46,905, दिंडोरी : 1,74,679, नाशिक पूर्व : 88,490, नाशिक मध्य : 1,04,737, नाशिक पश्चिम : 84,570, देवळाली : 1,16,242, इगतपुरी : 1,78,226, एकूण : 21,86,503