नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींमध्ये माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिंगणातील उमेदवारांकडून आता प्रचारावर भर दिला जात आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर गावोगावी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतील.
जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. या सर्व ठिकाणी माघारीनंतर 16 सरपंच व 544 सदस्य बिनविरोध निवडून आले. माघारीवेळी थेट सरपंचासाठी 302 अर्ज माघारीमुळे निवडणुकीच्या अंतिम रिंगणात 651 उमेदवार नशीब आजमावत आहेत, तर सदस्य पदासाठीच्या एक हजार 231 इच्छुकांनी माघार घेतल्यावर अंतिमत: 3400 उमेदवार रिंगणात उरले आहेत. सरपंच व सदस्यांसाठी उमेदवारांची संख्या बघता अनेक ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती होणार, हे निश्चित आहे. निवडणुकींची रणधुमाळी सुरू असलेल्या सर्व ग्रामपंचायतींसाठी येत्या 18 तारखेला मतदान होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवार (दि. 16) पर्यंत प्रचाराची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी प्रचाराची राळ उठविली आहे. प्रचार रॅली व चौकसभांसह मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला जातोय. त्यामुळे पुढील आठवडाभर गावागावांत आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडणार आहेत. तसेच गावाच्या विकासासाठी दावे – प्रतिदावे करताना आश्वासनांची बरसात उमेदवारांकडून केली जाईल. पण, या सर्व राजकीय धुराळ्यात मतदारांचे मनोरंजन होणार आहे.