Nashik : पिकअपमधून मद्यवाहतूक, 12 लाखांचा साठा जप्त | पुढारी

Nashik : पिकअपमधून मद्यवाहतूक, 12 लाखांचा साठा जप्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक – वणी रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 12 लाखांचा विदेशी मद्याचा अवैध साठ जप्त केला. एका पिकअप वाहनाद्वारे या मद्याची वाहतूक केली जात असतानाच, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळताच पथकाने नाशिक – वणी रोडवरील हॉटेल वंदेशसमोर सापळा रचला होता. अशोक लेलंडच्या दोस्त या माल वाहतूक करणाऱ्या वाहनाची (एमएच ४८ एवाय २९३५) तपासणी केली. त्यात या वाहनामध्ये १०० लिटर क्षमतेचे १२ प्लास्टिक ड्रम आढळले. याबाबत चालकांकडे चौकशी केली असता त्याने ड्रममध्ये साबणनिर्मितीस वापरण्यात येणारे एसएलईएस जेल असल्याचे सांगितले. तसेच याबाबतची कागदपत्रेही सादर केली होती. मात्र, अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ड्रमचे सील तोडून झाकण उघडून पाहिल्यावर त्यात प्रथमदर्शनी जेल दिसले. अधिक तपासणीत जेलच्या स्तराखाली दादरा व नगर हवेली व दमण- दिव येथे विक्रीकरिता (महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला) मद्याच्या सुट्या बाटल्यांचा साठा आढळला. यात इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की या ब्रॅण्ड असलेल्या सिलबंद बाटल्या (२४०) यात २० मद्यसाठा बॉक्स व १८० मिली क्षमतेच्या १९२० बाटल्या (४० बॉक्स), एक जिओ कंपनीचा मोबाइल व १२ प्लास्टिक ड्रम असा एकूण ११ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल आढळला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनचालक दीनानाथ सीताराम पाल (४६, मु. पो. रूम नं. ८, साईकृपा, ब्राह्मण गल्ली, उमेळमान, वसई, ता. जि. पालघर) याला ताब्यात घेतले आहे, तर चार संशयित फरार आहेत.

ही कारवाई अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक महेंद्र सोनार, कर्मचारी दीपक आव्हाड, एम. सी. सातपुते, व्ही. टी. कुवर, एस. डी. पोरजे, पी. एम. वाईकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अवैध मद्याची खेड्या-पाड्यांत विक्री

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण उपविभागीय हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध देशी – विदेशी मद्य विक्री होत आहे. अनेक खेडा-पाड्यांत ही विक्री वाढली आहे. त्याबाबत ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून राजरोस वाहतूक सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा :

Back to top button