Neo Metro Nashik : नाशिकच्या निओ मेट्रोचा मार्ग मोकळा होण्याची आशा | पुढारी

Neo Metro Nashik : नाशिकच्या निओ मेट्रोचा मार्ग मोकळा होण्याची आशा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नागपूर मेट्रोचे लोकार्पण रविवारी (दि. ११) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे याच दिवशी पंतप्रधानांकडून नाशिकच्या निओ (Neo Metro Nashik) मेट्रोबाबतही निर्णय होण्याची शक्यता असल्याने दोन वर्षांपासून अडकून पडलेल्या नाशिकच्या मेट्रो प्रकल्पाला चालना मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विद्यमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१८ रोजी नाशिकच्या मेट्रो सेवेची घोषणा केली होती. या घोषणेनंतर शहरात सिडको आणि महामेट्रोमार्फत मेट्रोसाठीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. नाशिकमध्ये (Neo Metro Nashik) मेट्रोसेवेसाठी आवश्यक असलेली ताशी २० हजार प्रवाशांची क्षमता नसल्याने एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो सुरू करण्याची शिफारस महामेट्रोने केंद्र शासनाला केली होती. त्यानुसार टायरबेस मेट्रोसेवेसाठी दिल्ली येथील राइट्स कंपनीकडून सर्वेक्षण हाेऊन या टायरबेस मेट्रो प्रकल्पाचे ‘मेट्रो निओ’ असे नामकरण झाले होते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात मेट्रो निओ प्रकल्पासाठी २,०९२ कोटींची आर्थिक तरतूद करण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पासाठी २१००.६ कोटी खर्च येणार असून, राज्य सरकार, सिडको आणि महापालिकेचा वाटा २५५ कोटींचा असणार आहे. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये, तर १,१६१ कोटी रुपये कर्ज स्वरूपात उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रकल्पासाठी निधीऐवजी महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे मेट्रो निओ प्रकल्पालाही फटका सहन करावा लागला.

नाशिक व वाराणसीमध्ये एकाच वेळी दोन्ही प्रकल्प साकारण्याची चर्चा होती. त्यामुळे नाशिकच्या प्रकल्प मंजुरीला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले होेते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर विधानसभा मतदारसंघातही निओ मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याने २५ जानेवारी २०२२ चा मुहूर्त निश्‍चित झाला होता. मात्र मुहूर्त हुकला.

नाशिक मेट्रोचे काम पूर्ण करण्यासाठी २०२३ ची मुदत देण्यात आली होती. मात्र अजूनही या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नसल्याने काम सुरू झालेले नाही. भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कडून पहिल्या कॉरिडोरसाठी ३६ व दुसऱ्या कॉरिडोरसाठी १४ असे एकूण ५० डब्यांचे (कोच) डिझाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button