नाशिक : ‘ब्लॅक लिस्ट’ची नोटीस बजावताच रस्ता झाला चकाचक | पुढारी

नाशिक : ‘ब्लॅक लिस्ट’ची नोटीस बजावताच रस्ता झाला चकाचक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काम होऊन अवघे दोन दिवस होत नाहीत, तोच गोविंदनगर ते भुजबळ फार्मकडे जाणार्‍या रस्त्याची चाळण झाली. ही बाब मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तातडीने दखल घेत संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची नोटीस बजावली आणि दुसर्‍याच दिवशी रस्ता चकाचक झाला.

दै. “पुढारी”ने दि. 27 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात मअवघ्या दोन दिवसांत रस्त्याची चाळणफ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मनपाचे गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांना यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टची नोटीस बजावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पाटील यांनी कमी प्रतीचे मटेरियल वापरल्याचे तसेच मनपाच्या आदेशांचे पालन न केल्याच्या कारणावरून काळ्या यादीत टाकण्याची नोटीस ठेकेदार एन. के. वर्मा यांना बजाविली होती. या नोटिसीमुळे ठेकेदाराने गोविंदनगर ते भुजबळ फार्म या रस्त्याचे काम पुन्हा पूर्ण करत रस्ता चकाचक केला. सुरुवातीला याच ठेकेदाराने 24 नोव्हेंबर रोजी काम केले होते. परंतु, काम केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी रस्त्याची खडी उघडी पडली होती. त्यामुळे रस्ता जुना की नवीन, असा प्रश्न निर्माण तर झालाच शिवाय खडी उघडी पडल्यामुळे त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली होती. पावसाळ्यात आणि त्याआधीही या रस्त्यात मोठ-मोठ्या खड्ड्यांना वाहनधारकांना सामोरे जावे लागले. पावसाळ्यात आणि त्यानंतर मनपाच्या बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेली जात होती. मनपातील काही अभियंते आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचेच काम केले जात असल्याने आजही निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. रस्त्यांबाबत मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकार्‍यांबरोबर बैठका घेऊन खड्डे दुरुस्तीबरोबरच डिफेक्ट लायबिलिटीजमधील रस्त्यांची कामे करण्याचे आदेश दिले. तसेच कामे न करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता.

माहिती असूनही कानाडोळा
इसंबंधित रस्त्यासाठी वापरले जाणारे डांबराचे प्रमाण व खडीचे ग्रेडेशन योग्य प्रकारचे नसल्याचे गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या निदर्शनास येऊनही या विभागाने त्याकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे ठेकेदारानेही मनमानीपणे काम करत मनपाची दिशाभूल केली होती.

हेही वाचा:

Back to top button