ग्रामपंचायत : नांदूरशिंगोटेत तिरंगी लढत; कारभारणींनी कमरेला खोचला पदर | पुढारी

ग्रामपंचायत : नांदूरशिंगोटेत तिरंगी लढत; कारभारणींनी कमरेला खोचला पदर

नाशिक (नांदूरशिंगोटे) : प्रकाश शेळके
नांदूरशिंगोटे गाव नेहमीच जिल्हा पातळीपर्यंत राजकारणात सहभागी असते. होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये येथील सरपंचपद थेट जनतेतून तेही ओबीसी महिला राखीव झाल्यामुळे गावकी व भावकी या नात्यातून अटीतटीची तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत तरुणवर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहे.

येथील सरपंचपद महिला राखीव असल्याने व थेट सरपंचपदासाठी येथील लंकावती विलासराव सानप, पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा दीपक बर्के तसेच अनिता अरुण शेळके या तीन महिलांच्या नावाची जोरदार चर्चा असून, यापूर्वीच प्रचार मोहिमेला सुरुवात झाली आहे. थेट जनतेतून सरपंचाच्या शर्यतीत आपणच सरस कसे? असेही पटवून दिले जात आहे. भावकी, वाड्याभोवती राजकारण फिरू लागले आहे. त्यामुळे आपल्या वाड्याचा सरपंच करण्यासाठी नातेसंबंधाचा मोठा आधार घेतला जात आहे. प्रत्येक इच्छुक सरपंचपदासाठी आपणच योग्य असल्याचे सांगत कामांचा लेखाजोखा मांडताना दिसत आहे. यापूर्वी सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे. मात्र आता थेट जनतेतून सरपंचपद असल्याने आपण या पदाचा अशा प्रकारे वापर करू पाच वर्षांचा कारभार व सर्वाधिकार वापरून कामे करू शकतो पटविण्यात इच्छुक उमेदवार व्यस्त आहेत. मातब्बर व आर्थिकदृष्ट्या सक्षम इच्छुक तयारीला लागले आहेत. येथे प्रथमच महिलेच्या रूपाने थेट जनतेतून सरपंच मिळणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गोपाळ शेळके यांनी थेट जनतेतून सरपंचाचा मान मिळवला होता. लंकावती सानप यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य पदावर काम केलेले असल्याने अनुभव व नात्यागोत्याची वीण, काम करण्याची जिद्द या जोरावर सरपंचपदावर दावा केला आहे. शोभा बर्के यांनी यापूर्वी पंचायत समितीवर सभापतिपद भूषवून शासकीय योजनांची माहिती घेतलेली आहे. तो अनुभव कामास येईल, अशी त्या खात्री देत आहेत. अनिता शेळके यांनी पतिराजांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कामांचा अनुभव व नात्यागोत्याचा आधार घेऊन ‘हम भी किसीसे कम नही’ असे सांगत कमरेला पदर खोचला आहे.

सरपंच पदासाठी चुरस वाढणार…
ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होत असल्याने सरपंचपदालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्ताधारी गट अनिता शेळके की शोभा बर्के यांच्यापैकी एक उमेदवारी देण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. विरोधी गटाकडून एकमेव लंकावती सानप यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दोन्ही गटांनी मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत इच्छुकांच्या याद्या तयार केल्या आहे. असे असले तरी ही यादी शेवटपर्यंत गुलदस्त्यात असेल.

हेही वाचा:

Back to top button