नाशिकच्या 'त्या'12 नाराज माजी नगरसेवकांची संजय राऊत काढणार समजूत | पुढारी

नाशिकच्या 'त्या'12 नाराज माजी नगरसेवकांची संजय राऊत काढणार समजूत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील डझनभर नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेत (शिंदे गट) जाणार असल्याच्या चर्चेला आलेले उधाण शमले असून, संबंधित नाराज १२ माजी नगरसेवकांना ठाकरे गटाकडून समझोता एक्स्प्रेसमध्ये बसविले जाणार आहे. नाराजांची समजूत आणि मनधरणी केल्यानंतरही संबंधितांकडून भविष्यात काय पवित्रा घेतला जाऊ शकताे, याचीदेखील ठाकरे गटाकडून चाचपणी केली जात असून, खासदार संजय राऊत नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत.

खासदार संजय राऊत यासंदर्भात गुरुवारी (दि.१) नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. दौऱ्यावर आल्यास दि. २ डिसेंबर रोजी ते पदाधिकाऱ्यांशी तसेच माजी नगरसेवकांबरोबर वन टू वन संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. यानंतर कार्यकर्ता मेळाव्याव्दारे ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अनेक ठिकाणी ठाकरे गटातून फाटाफूट झाली. परंतु, नाशिक त्यास अपवाद ठरले. यामुळे नाशिकमधून ठाकरे गटातून माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचे शर्थीचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे गटातील जवळपास डझनभर नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, तसे काहीच घडले नाही. यामुळे सुरू असलेली चर्चा थांबली असली तरी भविष्यात ही चर्चा खरी ठरू नये, याकरता ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतला आहे. यामुळेच संबंधित नाराज नगरसेवकांसह इतरही नगरसेवकांच्या अडचणी तसेच समस्या जाणून घेण्याकरिता खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येऊन होणारे बंड थांबविण्याचा प्रयत्न करणार आहेत.

डॅमेज कंट्रोल यशस्वी होणार का?

संभाव्य बंडाचे हे डॅमेज कंट्रोल रोखण्यात खासदार राऊत यांच्यासह वरिष्ठांना कितपत यश मिळते, याकडे लक्ष लागून आहे. पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना पर्यायी नेतृत्व तयार करण्याबाबत दिलेल्या सूचनेवर काय कार्यवाही झाली, याचाही आढावा खासदार राऊत बैठकीत घेणार आहेत.

खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यात प्रत्येक पदाधिकारी आणि नगरसेवकांशी वन टू वन चर्चा करणार आहेत. शुक्रवारी (दि.२) सायंकाळी मेळावा होण्याची शक्यता असून, अद्याप त्यांचा दौरा अंतिम झालेला नाही.

– भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख

Back to top button