नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात | पुढारी

नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टोकाच्या मतभेदामुळे गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांच्या नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या संस्थेच्या चाव्या प्रशासकांच्या हातात आहेत. आता पुन्हा एकदा निमा उद्योजकांना सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, उद्योजकांमधील मतभेद अजूनही कायम असल्याने, हा तिढा धर्मादाय सहआयुक्तांनाच सोडवावा लागणार आहे. विश्वस्तांची सात नावे सुचविण्यासाठी मुदतवाढ देऊनदेखील उद्योजकांचे एकमत झाले नसल्याने आता 39 नावांमधून धर्मादाय सहआयुक्तांनाच सात नावांची निवड करावी लागण्याची शक्यता आहे.

2020 पासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या निमावर विश्वस्त नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार धर्मादाय सहआयुक्तांनी उद्योजकांना विश्वस्तपदासाठी सात नावे निश्चित करण्याबाबत सुचविले होते. त्याकरिता सुरुवातीला 16 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार 11 नोव्हेंबर रोजी उद्योजकांची बैठकही पार पडली. मात्र, बैठकीत नावांंवर एकमत होऊ शकले नसल्याचे 14 नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले गेले. मात्र, ही बैठक होऊ शकली नाही, पुन्हा 15 नोव्हेंबरचा बैठकीचा मुहूर्त ठरला. मात्र, ही बैठकही बारगळली. अखेर धर्मादाय सहआयुक्तांनी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देत नावे निश्चित करण्याबाबत सांगितले. मात्र, गेल्या 15 दिवसांत एकही बैठक झाली नसल्याने, आता धर्मादाय सहआयुक्तांनाच हा तिढा सोडवावा लागण्याची शक्यता आहे. कारण बुधवार (दि.30)पर्यंत उद्योजकांकडून नावे निश्चित न झाल्यास धर्मादाय सहआयुक्तांकडूनच निमा विश्वस्तांच्या नावांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, निमा पदाधिकार्‍यांमधील वादामुळे 2020 मध्ये निमावर प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. पुढे संस्थेच्या कामकाजाचे नियमितीकरण करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांनी कार्यालयाकडून 4 ऑगस्ट 2021 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून विश्वस्तपदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. तेव्हा प्राप्त 40 अर्जांपैकी 39 अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया तातडीने पार पडून विश्वस्तांच्या नियुक्त्या होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडून ’आस्ते कदम’ भूमिका स्वीकारण्यात आली. आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हालचाली सुरू झाल्या असून, अर्ज करणार्‍या 40 इच्छुकांमधून सर्व सहमतीने सात नावे कळविणे अपेक्षित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे विसर्जन
धर्मदाय सहआयुक्तांनी नावे सुचविण्याबाबत सांगितल्यानंतर एक गटाच्या उद्योजकाने तत्काळ व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार करून त्यामध्ये 39 उद्योजकांना अ‍ॅड केले. त्याचबरोबर बैठकांबाबतची माहिती हा ग्रुप शेअर केली जात होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, हा ग्रुप विसर्जित करावा लागल्याची माहिती समोर येत आहे.

पहिल्या बैठकीला प्रतिसाद
11 नोव्हेंबर रोजी बोलाविलेल्या बैठकीला 39 पैकी 29 उद्योजकांनी हजेरी लावली होती. निवेक येथे ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गटप्रमुखांनी नावे निश्चित करावीत, असेही ठरले गेले. त्यानंतर 14 नोव्हेंबरला अंतिम बैठक नियोजित होती. मात्र, ही बैठक काही कारणांमुळे होऊ शकली नाही. पुन्हा 15 नोव्हेंबरला बैठक बोलावली, तीदेखील होऊ शकली नाही.

मेंबरशिप रद्द करा
निमावर गेल्यावेळच्या सत्ताधार्‍यांनी केलेली 640 सभासदांची मेंबरशिप रद्द करा, त्यानंतरच बैठकीचे बोला असा पवित्रा काही उद्योजकांनी घेतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बैठक न होण्यामागचे कारण मेंबरशिप तर नव्हे ना? असा प्रश्नही यानिमित्त उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा:

Back to top button