नाशिक जिल्हा बँकेत ओटीएस योजना लागू करा; राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | पुढारी

नाशिक जिल्हा बँकेत ओटीएस योजना लागू करा; राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या सोबत बैठक पार पडली. सोमवारी (दि. २९) पार पडलेल्या बैठकीमध्ये नाशिक जिल्हा बँके संदर्भात चर्चा झाली.

नाशिक जिल्हा बँकेत साधारण ६२००० शेतकऱ्यांचे १४०० कोटी रुपये थकीत असून या शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार बँकेने बंद केले आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांवर बँक जप्तीची कारवाई करत आहे. परंतु सरकारचे चुकीचे धोरण, नोटबंदी, बँकेचे चुकीचे व्याज दर यामुळे शेतकऱ्यांची रक्कम थकीत आहे. ही बाब राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली.

या शेतकऱ्यांना बँकेच्या पाशवी कर्जातून मुक्त करायचे असेल तर राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावा किंवा या बँकेला स्वतंत्रपणे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी यावेळेस राजू शेट्टी, संदीप जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या मागणीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील दुजारा दिला. आम्ही या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

नाशिक जिल्हा बँकेने 62 हजार शेतकऱ्यांवर अतिशय पाशवी पद्धतीने कर्जवसुलीची कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बँकेची ही दुरावस्था होण्यामध्ये नोटबंदी, प्रशासनाचा अंदागोंदी कारभार, भ्रष्टाचार कारणीभूत आहे. परंतु या सगळ्यांचा त्रास सर्वसामान्य शेतकऱ्यांना होतोय.

मागील काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात द्राक्षे, भाजीपाला या पिकांची दुर्दशा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला नाही आणि शेतकऱ्यांकडून कर्ज थकत गेले. बँकेने नियमबाह्य व्याज लावले. यामुळे मुद्दला पेक्षा अनेक पटीने व्याज वाढले आहे. जे शेतकऱ्यांच्या भरण्याच्या क्षमतेबाहेर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे आणि राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी आग्रही मागणी राजू शेट्टींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

Back to top button