धुळे: औद्योगिक वसाहतीतील चोरीचा छडा; दोघांना बेड्या | पुढारी

धुळे: औद्योगिक वसाहतीतील चोरीचा छडा; दोघांना बेड्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांना यश आले आहे. या चोरीचा उलगडा सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन करण्यात आला. त्यासाठी नवीन दुचाकी घेणाऱ्या 36 जणांची चौकशी केल्यानंतर दोघा चोरट्यांचा माग काढून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान शिवारातील औद्योगिक वसाहती मधील स्टेट बँकेच्या समोर असलेल्या एका गोदामात चोरी झाली. चोरट्यांनी या गोदामात प्रवेश करून ३ लाखांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणात रवींद्र मदनलाल जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी सुरू केला. मात्र, चोरट्यांनी मागे कोणताही सुगावा सोडलेला नव्हता. यात सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता चोरट्यांनी वापरलेल्या दुचाकीच्या समोर डिजिटल लाईट असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही दुचाकी नवी असल्याचा संशय कोते यांना आला.

त्यानुसार त्यांनी दुचाकी विक्री करणाऱ्या शोरूमच्या मालकाला भेटून नजीकच्या काळात विक्री झालेल्या दुचाकींची माहिती घेतली. त्यानंतर 36 दुचाकी खरेदी करणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली. याबरोबरच औद्योगिक वसाहत आणि मुंबई – आग्रा महामार्ग लगत असणाऱ्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात आले. या सर्व तपासाअंती पोलिसांचा तपास चोरट्यांपर्यंत जाऊन पोहोचला. पोलीस पथकाने धुळ्याच्या मौलवीगंज भागात राहणारा अजीम मोहम्मद अन्सारी तसेच रिजवान अहमद सगीर अहमद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी हमीद अन्सारी याच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान अजीम अन्सारी आणि रिजवान या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात केली. त्यानुसार त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button