Rohit Pawar : शेतकऱ्यांच्या हितासाठी शहरी-ग्रामीण वाद मिटवावा लागणार | पुढारी

Rohit Pawar : शेतकऱ्यांच्या हितासाठी शहरी-ग्रामीण वाद मिटवावा लागणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असताना उत्पादन वाढत असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्याच्या काळात शेतकऱ्यांपुढे हवामानातील सातत्याने बदल, शेतमालाच्या भावातील घसरण, विमा कंपन्यांकडून अडवणूक, सरकारकडून नुकसानभरपाई देण्यास विलंब अशा अनेक समस्या आहेत. यापुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी शहरी-ग्रामीण हा वाद नष्ट व्हायला हवा, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सोमवारी (दि.२८) कृषीथॉन प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गुणवंत संशोधक सन्मान, युवा प्रयोगशील संशोधक, गुणवंत विद्यार्थी यांना पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, के. के. वाघ एज्युकेशन सोसायटीच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख शिरीष साने, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, अंकिता न्याहारकर आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीत जाऊन प्रात्यक्षिकेद्वारे प्रशिक्षण घेतल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम होतील आणि पर्यायाने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, आजच्या काळात कृषीथॉन प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी एक रोल मॉडेल ठरले आहे. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत असताना आधीच्या काळात काय परिस्थिती होती, याचा आढावा घेऊन पुढे कसे जाता येईल, याचा विचार व्हावा. प्रदर्शनास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भेट दिल्याने प्रदर्शन अत्यंत यशस्वी झाले, अशी माहिती आयोजक संजय न्याहारकर व साहिल न्याहारकर यांनी दिली.

पुरस्कारार्थांची नावे अशी :

गुणवंत संशोधक सन्मान : युवा प्रयोगशील संशोधक २०२२- डॉ. अरविंद तोत्रे, डॉ. धनंजय देशमुख, डॉ. सचिन रामटेके, डॉ. सतीश बोरणारे, डॉ. श्रीकांत गोरे, डॉ. स्वप्नील ठाकरे. युवा प्रयोगशील संशोधक २०२० – डॉ. अंबादास मडकर, डॉ. मयूर विसपुते, नीलेश खाडे, डॉ. सौरभ केदार, डॉ. शांतीकुमार पाटील, डॉ. सुमेध हिवाळे. गुणवंत विद्यार्थी सन्मान २०२२ – बिभिषण आगे, अभयराज सिंग परमार, सिद्धनागौड बिरादार, कृष्णा चौधरी, दीपक दाते, श्रेयस डिंगोरे, सौरभ गायकवाड, सोमनाथ गायकवाड, गायत्री चावरे, प्रीती जावळे, खुशी, विशाल कुलकर्णी, करिष्मा मुजावर, शैला अरबोळे, शुभंकर.

हेही वाचा :

Back to top button