कणकवलीतील होमवर्क राणे पित्रा-पुत्रांच्या जिव्हारी : सुषमा अंधारे यांची जोरदार टीका | पुढारी

कणकवलीतील होमवर्क राणे पित्रा-पुत्रांच्या जिव्हारी : सुषमा अंधारे यांची जोरदार टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. माझे भाऊ नारायणराव यांचे दोन्ही लेेकरांकडे दुर्लक्ष झाले असून, या दोघांनाही संस्कार व वळण लावण्यात भाऊ कमी पडला, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका केली. कणकवलीमध्ये जाऊन मी घेतलेला होमवर्क राणेंच्या जिव्हारी लागला, असाही आरोप त्यांनी केला. राज्यपाल हे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याची खाेचक टिप्पणीही अंधारेंनी केली.

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेच्या नियोजनासाठी रविवारी (दि. २७) अंधारे या नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना ट्विट केलेल्या व्हिडिओवरून अंधारे यांनी राणे कुटुंबावर टीकेची झोड उठविली. त्या म्हणाल्या की, नीतू यांनी ट्विट केलेला व्हिडिओ १० ते १५ वर्षांपूर्वी वादविवाद स्पर्धेतील आहे. त्यावेळी समोरच्या व्यक्तीेचे म्हणणे खंडन करण्याचा प्रयत्न मी करत असल्याचे अंधारेंनी सांगितले. मात्र, नीतूने हा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करत त्यांचे संस्कार दाखविले. अर्थात कणकवलीत मी घेतलेला हाेमवर्क जिव्हारी लागला असून त्यांची कानशिलं लाल झाली आहेत. अशावेळी नैराश्य व अस्थिरतेमधून ते बोलले असतील, मी समजू शकते, असा टोलाही अंधारेंनी राणेंना लगावला.

अंधारे यांनी यावेळी भाजपला टार्गेट करत टीका केली. भाजप त्यांच्या पक्षातील मूळच्या लोकांना न्याय देऊ शकलेला नाही. भ्रष्टाचाराची प्रकरणे काढणाऱ्या किरीट सोमय्यांना एखादे मंत्रिपद देऊन त्यांचे पुनर्वसन करणे गरजेेच होते. माधव भंडारी आणि केशव उपाध्ये हे बरीच वर्षे कष्ट करत असतानाही भाजपला त्यांना काहीच देता आले नाही. यावरून भाजपमध्ये जुने विरोधात नवे असा संघर्ष सुरू असल्याचा दावा अंधारेंनी केला. दरम्यान, नाशिकमधील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप अंधारेंनी केला. महिलांबद्दल असभ्य वक्तव्य करणारे रामदेव बाबा यांना अमृता फडणवीस यांनी तेव्हाच का खडसावले नाही, असेही अंधारे म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात जात नव्हते, अशी त्या लोकांची तक्रार होती. आताचे मुख्यमंत्री तरी कुठे मंत्रालयात जातात? ते गणपती, नवरात्र, आणि पितृपक्ष जेवायला जातात. या सर्वांतून वेळ मिळाला, तर ते ज्योतिषाला हात दाखवायला जातात, अशा शब्दांत अंधारेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राज्यातील मंत्री-आमदार दोन दिवस गुवाहाटीला गेले, तर इकडे राज्यात कोण लक्ष देणार? तसेच अब्दुल सत्तार कामाख्या देवीच्या दर्शनाला का गेले नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने अंधारे यांनी शिंदे गटाला केला.

भुसे, कांदे यांची भेट घेणार

प्रबोधन यात्रेनिमित्त १६, १७ आणि १९ डिसेंबरला मी नाशिक, मालेगाव व नांदगावचा दौरा करणार आहे. यावेळी दादा भुसे आणि सुहास कांदे या भावांना भेटायलला जाणार आहे. यावेळी सुहासभाऊंची विस्ताराने भेटणार आहे. अर्थातच मनमाडच्या सुहासभाऊलाच मी भेटणार आहे, असा उपरोधिक टोला अंधारे यांनी लगावला. औरंगाबादेत संजयभाऊ नाराज आहे. शिंदे गटातील नाराजांची संख्या फार मोठी आहे. या अंतर्गत लाथाळ्या हळूहळू बाहेर येत राहतील, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button