नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत वृद्धाचा खून, घरातील रोकड'ही लुटली | पुढारी

नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत वृद्धाचा खून, घरातील रोकड'ही लुटली

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

घरातील व्यक्ती विवाह कार्यक्रमासाठी गेलेले असताना अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट येथे कर्डिले मळ्यात अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून एकट्या असलेले ६५ वर्षीय वृद्धाचा खून करून घरातील सोने व रक्कम असलेली कोठी चोरुन नेली आहे.  बच्चू सदाशिव कर्डिले ( ६५ ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्डिले यांच्या घरात लग्न समारंभ असल्यामुळे घरातील इतर सदस्य गंगापुर येथील मंगल कार्यालयात हळद कार्यक्रमा साठी गेले होते. कर्डिले हे घरात एकटेच टिव्ही पहात असताना शुक्रवारी रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्ती घरात शिरून त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा घरातील इतर सदस्य हळदी कार्यक्रमावरून रात्री १० वाजता घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला.

अज्ञात चोरट्यांनी कर्डिले यांच्या घरातील सुमारे सहा ते सात लाखांची रोकड व सोन्याचे दागिने असलेली कोठी लंपास केली. दरम्यान, घटनेची माहिती समजताच परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ, मध्यवर्ती गुन्हे शाखा वरिष्ठ निरीक्षक आंचल मुदगल, सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी जगन्नाथ कर्डीले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर भादवी कलम ४६० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख करीत आहेत. मयत बच्चू सदाशिव कर्डिले यांच्या पश्यात पत्नी दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंबड गाव स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button