नाशिक जिल्हा रुग्णालयात शवागारातील मृतदेहांना दुर्गंधी | पुढारी

नाशिक जिल्हा रुग्णालयात शवागारातील मृतदेहांना दुर्गंधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील शवागारातील शीतपेट्या नादुरुस्त झाल्याने तेथील मृतदेहांना दुर्गंधी सुटली आहे. त्याचप्रमाणे बेवारस मृतदेहांचा प्रश्नही ऐरणीवर असतो. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाने जिल्हा नियोजन समितीकडे तीनदा ५० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवूनही त्यावर निर्णय न झाल्याने शवागाराचा प्रश्न कायम आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.२४) पालकमंत्री दादा भुसे यांनी शवागाराची पाहणी केली.

जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृह व शवागार असून, त्यात शवविच्छेदन करण्यासाठी तीन ओटे असून, शवागारात ५४ शवपेट्या आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी या शवपेट्या नादुरुस्त झाल्या आहेत. सहा शवपेट्या सद्यस्थितीत चांगल्या असून, त्यांच्यावरच मृतदेह सुस्थितीत ठेवण्याचा भार आहे. वारंवार पाठपुरावा करूनही या शवपेट्यांची तात्पुरती दुरुस्ती केली जात होती. मात्र, त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. बेवारस मृतदेहांची संख्या वाढत असल्याने शवागारासह परिसरात दुर्गंधी पसरल्याचे चित्र कायमचे झाले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शवविच्छेदन गृहासह शवागाराची क्षमता वाढवण्यासोबतच शवविच्छेदन गृहातील ओट्यांची संख्या वाढवण्याची मागणी आहे. यासंदर्भात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीकडे ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली असून, त्यात एका मोठ्या खोलीचे तापमान नियंत्रित करून मृतदेह त्या ठिकाणी स्ट्रेचरवर ठेवण्यात येतील. जेणेकरून त्यांचे जतनही योग्यरीत्या होण्यास मदत होऊ शकते. मात्र, या प्रस्तावास मंजुरी न मिळाल्याने शवागाराचा प्रश्न प्रलंबित आहे. निधी मंजूर झाल्यास शवागाराचा प्रश्न निकाली निघेल व दुर्गंधीसह मृतदेहांची हेळसांड थांबेल, असा विश्वास रुग्णालयाने वर्तवला आहे. पालकमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर सायंकाळपर्यंत सहा मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांनी केली पाहणी

गुरुवारी (दि.२४) पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाची पाहणी केली. तेथील अस्वच्छता व दुर्गंधीसंदर्भात त्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनास जाब विचारला. तसेच पोलिसांना बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले. शवागाराच्या निधीबाबत सकारात्मक असून, वरिष्ठापर्यंत पाठपुरावा करेल, असे आश्वासन ना. भुसे यांनी दिले.

हेही वाचा :

Back to top button