नाशिक जिल्हा ‘या’ तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री दादा भुसे यांची घोषणा | पुढारी

नाशिक जिल्हा 'या' तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री दादा भुसे यांची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व महामार्गांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येतील. नाशिक शहरातील खड्ड्यांबाबत तीन दिवसांमध्ये मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बांधकाम विभागाने जिल्ह्यात १४ ठिकाणच्या ब्लॅकस्पाॅटवर डिसेंबर अखेरपर्यंत उपाययोजना राबविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीजकनेक्शन तोडू नये, असे आदेश महावितरणला दिल्याचे पालकमंत्री दादा भुसे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. २४) पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी कर्जमुक्ती, महावितरण, बांधकाम विभाग तसेच जिल्हा रुग्णालयांची आढावा बैठक घेतली. ते म्हणाले की, अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, खड्डेदेखील पडले आहेत. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले असून, त्यात बळीदेखील जात आहेत. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम बांधकाम विभाग पूर्ण करणार आहे. रस्त्यांची कामे पूर्ण करताना त्यांची गुणवत्ता राखली जावी, असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिल्याचे ना. भुसे यांनी सांगितले. जिल्ह्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांत झालेल्या रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे. यामध्ये संबंधित ठेकेदारांमार्फत दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी बांधकाम विभागाला दिले.

शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबिल वसुली थांबवावी, असे आदेश ना. भूसे यांनी महावितरणला दिले. तसेच ना दुरुस्त व खराब टान्स्फॉर्मर तातडीने बदलून द्यावे. शेतकऱ्यांसाठी विजेसंदर्भातील विविध शासकीय योजनांबाबत जनजागृती करणे आवश्यक असताना, महावितरणचे अधिकारी केबिनबाहेर पडत नसल्याची नाराजी ना. भुसे यांनी व्यक्त केली.

अनुदानाची रक्कम कर्जखात्यात नको : भुसे

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना शासनाने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहेत. संबंधित अनुदानाची रक्कम कर्जखाते व अन्य ठिकाणी वळते करू नये, असे आदेश पालकमंत्री भुसे यांनी जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांचे १९,४८३ खातेदार, तर जिल्हा बँकेचे १२,५०० खातेदार आहेत. त्यापैकी राष्ट्रीयीकृत बँकांच्या ७,३४७ खातेदारांना अनुदान प्राप्त झाले असून, उर्वरित खातेदारांना पुढच्या टप्प्यात अनुदानाची रक्कम देण्यात येणार असल्याचे ना. भुसे यांनी सांगितले.

पदाचे भान राखावे : भुसे

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना ना. भुसे म्हणाले की, व्यक्ती कोणीही असो, बोलताना पदाचे भान राखले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हेेे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर जगाच्या पाठीवर आदर्श राजे आणि सर्वांचा स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच इतरही महापुरुषांबददल बोलताना प्रत्येकाने भान राखले पाहिजे. कटुता निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळायला हवीत, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत पालकमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे

– प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावे.

– शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित करू नये.

-शेतकर्‍यांना आठ तास वीजपुरवठा करावा.

-खराब ट्रान्स्फाॅर्मर आठ दिवसांत बदलून द्यावे.

-गोवरच्या संसर्गाची परिस्थिती जिल्ह्यात नियंत्रणात.

– पालकांनो, बालकांचे लसीकरण करून घ्यावे.

-गोवरसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

– गायरान जमिनींवरील कारवाईत दुजाभाव केला जाणार नाही.

हेही वाचा :

 

Back to top button