Nashik Crime : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा खून | पुढारी

Nashik Crime : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा खून

नाशिक / त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वरजवळील तुपादेवी फाट्यानजीक असलेल्या आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास साडेतीन वर्षीय मुलाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आलोक विशाल शिंगारे असे या बालकाचे नाव असून, त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुला-मुलींचा सांभाळ करण्यासाठी आधारतीर्थ आश्रम ओळखला जातो. या आश्रमात दीड ते सतरा वयोगटातील 130 मुले-मुली असल्याची माहिती आश्रमाच्या कर्मचार्‍यांनी दिली. दरम्यान, आश्रमाच्या आवारात मंगळवारी सकाळच्या सुमारास आलोक निपचित पडलेला आढळून आला. आश्रमाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने त्यास त्र्यंबकेश्वरच्या रुग्णालयात व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, आलोकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संशयास्पद मृत्यू असल्याने आलोकचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आलोकचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. आलोकचे कुटुंबीय उल्हासनगर येथे वास्तव्यास आहेत. दरम्यान, या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अज्ञात मारेकर्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आधारतीर्थ आश्रमात धाव घेतली. फॉरेन्सिक पथकासह ठसेतज्ज्ञ, श्वानपथकाने घटनेचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्यासह पथकाने आश्रमात दिवसभर चौकशी केली. त्यात तेथील मुला-मुलींसह कर्मचार्‍यांचेही जबाब घेण्यात येत होते.

भावासह होता वास्तव्यास
आलोक व त्याचा मोठा भाऊ आयुष हे दोघे 19 ऑगस्टपासून आश्रमात राहत असल्याची माहिती त्यांची आई सुजाता शिंगारे यांनी दिली. दिवाळीत दोघांनाही घरी नेले त्यावेळी विचारपूस केल्यावर दोघांनी आश्रमात काहीही त्रास नसल्याचे सांगितले. त्यांना पुन्हा आश्रमात सोडले होते. आयुषने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. 21) रात्री आठ वाजता आलोक त्याच्याजवळच झोपला होता. मात्र मंगळवारी (दि.22) सकाळी तो आश्रमाच्या आवारात निपचित पडलेला होता.

मंगळवारी (दि.22) सकाळी आश्रमातून फोन आला की, आलोक बेशुद्ध पडला आहे. तुम्ही जिल्हा रुग्णालयात या. त्यामुळे मी उल्हासनगरहून नाशिकला आले. आश्रमाकडून मला जास्त माहिती दिली नाही. मात्र, मोठा मुलगा आयुष याने दिलेल्या माहितीनुसार, आलोकला एका मुलाने मारहाण केली होती. त्यामुळे आलोकचा घातपात झाला आहे.
– सुजाता शिंगारे, आलोकची आई

हेही वाचा :

Back to top button