धुळे : अपहरण झालेल्या मजुराची 24 तासांत सुटका, आरोपी गजाआड | पुढारी

धुळे : अपहरण झालेल्या मजुराची 24 तासांत सुटका, आरोपी गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राजस्थानी मजुराचे धुळ्यातून अपहरण करणाऱ्या तिघांना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जवळून अटक करण्यात तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले आहे. अवघ्या 24 तासात मोबाईल लोकेशनचा आधार घेत या आरोपींच्या ताब्यातून अपह्रत मजुराची देखील सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.

धुळे शहरात भूमिगत केबल अंथरण्याचे काम करणाऱ्या भुरसिंग रमेशचंद्र जोगी याला अज्ञात तिघांनी कारमध्ये बसवून पळवून घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तातडीने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सतर्क झाले. या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम 363, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हातात घेऊन तपासाची सूत्रे फिरवली. त्याची तक्रार मजुरासमवेत काम करणाऱ्या अन्य मजुरांनी दिल्यामुळे अपहरण करणाऱ्या व्यक्तींचे धागेदोरे शोधणे पोलिसांनी सुरू केले. मात्र अपहरण झालेल्या मजुराकडे कोणताही भ्रमणध्वनी नसल्यामुळे तपासाला मोठी अडचण निर्माण झाली. अशा परिस्थितीत आरोपीच्या मोबाईल वरून जोगी यांनी धुळ्यात अन्य एका मजुराला संपर्क केला. त्यांच्या समवेत संपर्क साधत असताना तो रेल्वेने इंदोरकडे जात असल्याची माहिती दिली. याच मोबाईल नंबरचे लोकेशन पोलीस निरीक्षक शिंदे यांनी ट्रॅक करण्यास सुरुवात केली.

त्यानुसार आरोपी हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर नजीकच्या मुरैना परिसरात असल्याची खात्री झाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक राजश्री पाटील तसेच राकेश मोरे, कांतीलाल शिरसाट, योगेश पाटील, नितीन दिवसे या सर्वांनी मुरैना गावात संशयित ठिकाणी छापा मारला असता अपहरण केलेल्या भुरसिंग जोगी या मजुरासह विजेंद्र बाबूलाल यादव, हरीसिंग किशोरीलाल जोगी, हैञाम यादव या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना तातडीने धुळे येथील तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या कामासाठी झाले होते अपहरण

अपहरण झालेला मजूर आणि आरोपीचा भाऊ हे सहा महिन्यापूर्वी मुक्ताईनगर परिसरात भूमिगत केबल अंथरण्याचे काम करीत होते. या भूमिगत केबल टाकण्यासाठी वापरली जाणारी मशीन घेऊन तिघेजण पसार झाले होते. यातील दोघेजण हे सापडले. मात्र आरोपीचा भाऊ हा सापडला नाही. त्यामुळे या भावाचे काही बरे वाईट झाले असल्याचा संशय या आरोपींना होता. त्यामुळेच त्यांनी भुरसिंग जोगी याला ताब्यात घेऊन त्याचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. मात्र मुक्ताईनगर परिसरात झालेल्या गुन्ह्याची कोणतीही नोंद संबंधित भूमिगत केबल अंथरण्याचे काम करणारी कंपनीकडून पोलिसांना देण्यात आलेली नसल्यामुळे हा सर्व घोळ झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. दरम्यान या तिघाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button