नाशिक : एफपीएचा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा | पुढारी

नाशिक : एफपीएचा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
शिकण्याची इच्छा आणि आवड असेल, तर शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते, असे प्रतिपादन डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. स्प्लेंडर हॉल येथे फॅमिली फिजिशियन असोसिएशन (एफपीए) संस्थेचा नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा, सुसंवाद स्मरणिका प्रकाशन सोहळा व स्व. डॉ. वसंतराव गुप्ते स्मृती व्याख्यान तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा अशा बहुरंगी कार्यक्रमाप्रसंगी डॉ. तात्याराव लहाने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सीमा हिरे होत्या. यावेळी व्यासपीठावर नूतन अध्यक्ष डॉ. विनय मोगल, माजी अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, मावळते अध्यक्ष डॉ. पंकज देवरे, सचिव डॉ. शीतल सुरजुसे, खजिनदार डॉ. विजय मुंदडा आदी उपस्थित होते.

डॉ. लहाने यांनी फॅमिली डॉक्टरचे समाजातील स्थान व महत्त्व अधोरेखित केले. भाषा कोणतीही असली, तरी ती सर्वसामान्यांना समजली पाहिजे. आपल्या कामाप्रती निष्ठा आणि तळमळ असावी, तसेच संघटनाचे महत्त्वदेखील त्यांनी सांगितले. दरम्यान यावेळी एफपीएची नूतन कार्यकारिणी जाहीर केली असून यात नूतन अध्यक्ष डॉ. विनय मोगल यांनी मावळते अध्यक्ष डॉ. पंकज देवरे यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. डॉ. शीतल सुरजुसे यांनी सचिवपदाचा व डॉ. विजय मुंदडा यांनी खजिनदारपदाचा कार्यभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी डॉ. तेजस्विनी सोलोमन, सहसचिव डॉ. अविनाश पवार, सुसंवाद संपादक डॉ. मनीष पवार, सहसंपादक डॉ. मंजुषा व्यवहारे, संघटक डॉ. रूपेश मर्दा व डॉ.ज्योती पाटील, कार्यकारिणी सदस्य डॉ. अनुपमा मराठे, डॉ. सुनंदा मुंदडा, डॉ. मनीषा मर्दा, डॉ. प्रियांका बेंडाळे यांनी पदभार स्वीकारला. या वेळी आमदार सीमा हिरे यांनी आपसातील हेवेदावे विसरून सर्व वैद्यकीय बांधवांनी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉ. सुनंदा मुंदडा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.

हेही वाचा:

Back to top button