अ‍ॅड. नितीन ठाकरे : पोलिस भरती उपक्रमातून विद्यार्थ्यांना ‘ऊर्जा’ | पुढारी

अ‍ॅड. नितीन ठाकरे : पोलिस भरती उपक्रमातून विद्यार्थ्यांना ‘ऊर्जा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऊर्जा युवा प्रतिष्ठानने नाशिककरांसाठी राबविलेले सर्वच उपक्रम वेगळे ठरले आहेत. प्रतिष्ठानचा पोलिस भरती प्रशिक्षण उपक्रम विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने ‘ऊर्जा’ देणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला.

ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे पोलिस भरती स्वयंम मूल्यमापन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केटीएचएमच्या प्रांगणात आयोजित या शिबिराचे उद्घाटन अ‍ॅड. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, बाळासाहेब शिंदे, माजी नगरसेवक विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, सुदाम डेमसे, केटीएचएमचे प्राचार्य व्ही. बी. गायकवाड, अनिल चौघुले, अश्वमेध अकॅडमीचे संचालक मनीष बोरस्ते, अमित बोरस्ते, संजय घोडके आदी उपस्थित होते. विजय करंजकर यांनी शिबिरात भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पोलिस भरतीवेळी नक्कीच फायदा होईल. या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी भरतीत निवडले जातील, असा विश्वास व्यक्त केला. अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय मराठी व इंग्लिश विषयाचे ऑनलाइन मार्गदर्शन देणार असल्याचे सांगितले. बाळासाहेब शिंदे यांनी पोलिस भरतीवेळी लेखी परीक्षेतील मराठी विषयातील व्याकरणावर आधारित प्रश्न व त्यांची उत्तरे याबाबत मार्गदर्शन केले. भरती प्रशिक्षण शिबिराला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 1100 जणांनी सहभाग नोंदविला आहे. शिबिरात शनिवारी (दि. 19) शारीरिक चाचणी, कागदपत्रांची तपासणी व त्यांची कमतरता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांची उंची, मुलांसाठी 1600 मीटर, तर मुलींसाठी 800 मीटर धावणे तसेच गोळाफेकची चाचणी घेण्यात आली. रविवारी (दि. 20) लेखी परीक्षा झाली.

हेही वाचा:

Back to top button