नाशिक : आदिवासी महोत्सवाचा समारोप | पुढारी

नाशिक : आदिवासी महोत्सवाचा समारोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नंदुरबार येथील होळी नृत्य व धुळे येथील वीर बिरसा मुंडा होळी नृत्याने राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात बाजी मारत अव्वल स्थान पटकाविले. जुन्नरच्या वससुबाई लेजीम पथक, चिमूरच्या आदिवासी पारंपरिक परधान पथकाच्या गोंडी ढेमसा नृत्य तसेच पांढरकवडाच्या घुसडी ढेमसा नृत्याला द्वितीय क्रमांक मिळाला. यवतमाळचे भिल्ल/नाईकडा सेवा नृत्य व मोखाडाचे आई जगदंबा ग्रुप-घोसाळी ढोलनाच पथक तिसर्‍या क्रमांकावर राहिला. धुळ्याच्या आमची माती-आमची माणसं(पावरी नृत्य) व गडचिरोलीच्या राणी दुर्गावती रेला ढेमसा नृत्य (गोंड माडिया) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून ईदगाह मैदानावर चारदिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यातील सुमारे 41 आदिवासी कलाकारांचे पथक सहभागी झाले होते. या नृत्य स्पर्धेतून महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची पारंपरिक वेशभूषा व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. पारंपरिक वाद्यांसह विविध वन्यप्राण्यांची वेशभूषा करून पारंपरिक नृत्यावर थिरकणार्‍या आदिवासी बांधवांना प्रेक्षकांचा चारही दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक हंसध्वज सोनवणे, उपआयुक्त विनित पवार, आदिम जमाती कक्ष राज्य समन्वयक तथा प्रकल्प संचालक दशरथ पानमंद, एकलव्य निवासी स्कूलचे प्राचार्य सुरेश देवरे यांनी काम बघितले. परीक्षकांच्या हस्ते नृत्य स्पर्धेतील विजेत्या पथकास गौरविण्यात आले.

लघुपटांचे सादरीकरण
राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी आदिवासी जीवन, कला व संस्कृती यावर आधारित आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून लघुपट प्रदर्शित करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने वारली, भील्ल, कोलम आदी जमातींवर आधारित लघुपटांचा समावेश होता. ’घांगळी’ आणि ’भुम्या’च्या माध्यमातून आदिवासी चालरितींवर भाष्य करण्यात आले. तर ’सबिना’मध्ये आदिवासी विद्यार्थिनींचा सरपंचपदापर्यंत प्रवास मांडला आहे.

हेही वाचा :

Back to top button