ग्रामपंचायत : नांदगावी निवडणुकीचा धुरळा ; गावोगावी राजकारण तापले | पुढारी

ग्रामपंचायत : नांदगावी निवडणुकीचा धुरळा ; गावोगावी राजकारण तापले

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने असल्याने गावोगावी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

तालुक्यातील शास्त्रीनगर, धोटाणे खुर्द, मूळडोंगरी, तळवाडे, हिरेनगर, हिसवळ बुद्रुक, लोंढरे, कसाबखेडा, लक्ष्मीनगर, नागापूर, धनेर, भार्डी, बोयगाव, नवसारी, पिंपरखेड आदी मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच गावातील राजकीय पुढार्‍यांनी आपले दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. गावपातळीवरील सत्ताधारी, विरोधी गटांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. प्रत्येक वॉर्डनुसार मतदारांची नावे, मोबाइल नंबर मिळविले जात आहेत. वाड्या-वस्त्यांवर शोध घेऊन एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी माध्यमांद्वारे मतदारांची माहिती घेऊन गाव, प्रभागनिहाय राजकीय स्थितीचा अंदाज घेत संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या निवडणुकीतून थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने कार्यकत्र्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसत आहे. सरपंचपदाचा उमेदवार ठरविताना गावनेत्यांचा कस लागणार आहे. थेट सरपंचपदामुळे या निवडणुकीत आगळा रंग भरणार आहे. तसेच उमेदवारीवरून बंडखोरी होऊ नये, यासाठी सरपंचपदाचा उमेदवार हा संबंधित गटातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच ठरवावा लागणार आहे. उमेदवाराचे राजकीय वलय, स्थानिक पातळीवरील गटा-तटाचे, भावकीचे राजकारण यावरच उमेदवारीचे भवितव्य ठरणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम….
18 नोव्हेंबर : नोटीस प्रसिद्ध करणे
28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर :
नामनिर्देशनपत्र दाखल
5 डिसेंबर : नामनिर्देशनपत्रांची छाननी
7 डिसेंबर : माघार घेणे
18 डिसेंबर : मतदान
20 डिसेंबर : मतमोजणी

एकूण निवडणूक ग्रामपंचायत संख्या : 15
एकूण प्रभाग : 47
थेट सरपंच निवड संख्या : 15
एकूण सदस्य निवड संख्या :123
एकूण मतदार केंद्र संख्या : 47
एकूण मतदार : 18499

हेही वाचा:

Back to top button