नाशिक : अशोकस्तंभ परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी | पुढारी

नाशिक : अशोकस्तंभ परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अशोकस्तंभ परिसरात सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या परिसरातून बहुतांश शहर बस जात असल्याने, तेथील व्यावसायिक संकुल, अतिक्रमण, नोकरदार-विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांमार्फत वाहतूक कोंडी सोडवली जात असली तरी सकाळी व सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे वाहनचालकांना काही वेळ ताटकळत बसावे लागत आहे.

अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल या मार्गावर स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट रोड तयार करण्यात आला आहे. या मार्गावर जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायालय, शाळा, व्यावसायिक संकुल आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावरून स्मार्ट बसचा प्रवास सर्वाधिक आहे. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था असल्याने सकाळ व सायंकाळच्या सुमारास या मार्गावर सर्वाधिक गर्दी पाहावयास मिळते. एकाच वेळी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यातच काही बेशिस्त चालक वाहतूक नियम मोडून वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. काही वाहनचालक पर्यायी मार्गांचा वापर करत असल्याने तेथेही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्यानंतर अशोकस्तंभावरील चारही मार्गांवर वाहनांच्या रांगा असतात. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा:

Back to top button